
नांदेड – जिल्ह्यात दोन दिवसापासून पाऊस सुरू असून अजूनही काही तास हवामान विभागाने नांदेडसह मराठवाड्यातील जालना, परभणी, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्ह्यातील किनवट, हिमायतनगर, हदगाव या तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली असून अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी दिली आहे.
जिल्ह्यात पावसाने सध्या चांगले बसताना बसवले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ५५ टक्के पाऊस पडला आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील प्रकल्पांची परिस्थिती चिंताजनक होती. आता दोन दिवसाच्या पावसाने जिल्ह्यातील प्रकल्प समाधानकारक भरले आहेत. त्याचवेळी काही ठिकाणी पूर परिस्थितीही उद्भवली आहे. शुक्रवारी मुखेड, कंधार तालुक्यातील काही गावांना नदी नाल्यांचा पुराचा फटका बसला होता. शनिवारी जिल्ह्यातील किनवट, हिमायतनगर, हदगाव या तालुक्यात अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. परिणामी येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
हवामान विभागाने नांदेड जिल्ह्याला आगामी काही तासांसाठी रेड अलर्टचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आपत्ती निवारणासाठी सज्ज असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक यासह इतर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना मुख्यालय राहण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. कोणतीही परिस्थिती उद्भवल्यास त्या परिस्थितीत नागरिकांना मदत मिळावी,, या अनुषंगाने प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील किनवट आणि हिमायतनगर तालुक्यातील काही भागात पाणी शिरल्याने तेथील काही कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. आपत्ती निवारणाच्या अनुषंगाने यापूर्वीच उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना यंत्रणांना दिले आहेत. कंधार आणि किनवट तालुक्यातील बोधडी रस्त्यावर घडलेली घटना वगळता इतर कुठेही आपत्तीची घटना नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अंबेकर यांनी सांगितले.



