
नांदेड – जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या सर्वदूर पावसाने बळीराजाला दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील २७ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. विष्णूपुरी प्रकल्प क्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. निम्म्या नांदेडसाठी वरदान ठरलेल्या ईसापूर धरणाचेही पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात गोदावरीसह, पैनगंगा, मन्याड, आसना या प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मुखेड, कंधार, हदगाव या तालुक्यात काही गावात पाणी शिरले असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
विष्णूपुरी प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडले असून प्रकल्पाचा १५,१७ आणि ५ क्रमांकाचा दरवाजा उघडण्यात आला आहे. या तीन दरवाज्यातून ४४ हजार ७०७ क्युसेस वेगाने गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. नांदेडसाठी महत्त्वाच्या असलेल्या ईसापूर धरणाचेही पाच दरवाजे उघडण्यात आले असून पैनगंगा नदीला मोठा पूर आला आहे. या पुराने इस्लापूर येथील सहस्त्रकुंड धबधब्याने पुन्हा एकदा अक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे. गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे मुखेड, हदगाव, कंधार या भागातील नदी नाल्यांना पूर आला असून काही गावांमध्येही पाणी शिरले आहे. या पुरामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही गावांचा संपर्कही तुटल्याची माहिती सूत्रांनी दिली.
फुलवळ महसूल मंडळात एकाच दिवशी १३३ मिलिमीटर पाऊस..! शुक्रवारी सकाळी झालेल्या नोंदीनुसार जिल्ह्यात मुखेड तालुक्यातील मुखेड जांब आणि चांडोळा या महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. कंधार तालुक्यातील कंधार, कुरुळा, फुलवळ उस्माननगर आणि दिग्रस बु. या मंडळातही अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. लोहा तालुक्यातील लोहा, माळाकोळी, सोनखेड आणि कलंबर, हदगाव तालुक्यातील आष्टी, भोकर तालुक्यातील भोकर, मोघाळी आणि मातूळ, देगलूर तालुक्यातील देगलूर, खानापूर, नरंगल बु., मुदखेड तालुक्यातील मुगट, उमरी तालुक्यातील उमरी, सिंधी आणि धानोरा तर नायगाव तालुक्यातील बरबडा, कुंटूर, नायगाव आणि मांजरम या चार महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक १३३.२५ मिलिमीटर पावसाची नोंद फुलवळ महसूल मंडळात झाली आहे. १११.७५ मिलिमीटर पावसाची नोंद उमरी महसूल मंडळात आणि बरबडा महसूल मंडळात १००.७५, भोकर महसूल मंडळात १०९.७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.



