क्राईम

नांदेड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांवर हल्ला

अवैध दारू विक्रेते झाले आक्रमक, हदगाव पाठोपाठ मुखेडमध्येही पोलीस उपनिरीक्षकांना मारहाण

नांदेड – जिल्ह्यात पोलिसांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैध धंद्यावर मोठी कारवाई सुरू केली आहे. वर्षभरापासून हे कारवाई सत्र सुरू असताना जिल्ह्यात २ व ३ ऑक्टोबर रोजी पोलिसांवर अवैध दारू विक्रेत्यांनी हल्ला चढविला आहे. हदगाव पाठोपाठ मुखेडमध्येही असा प्रकार घडला असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मुखेड येथे वाल्मिकनगरात मुखेड ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गणेशराव तुतुरवाड हे शुक्रवारी पांडुरंग रघुनाथ माचेवाड याच्याविरुद्ध अवैध दारू विक्रीची केस करीत होते. त्यावेळी दारू विक्रेत्याचा भाऊ अंकुश रघुनाथ माचेवाड हा थेट मुखेड पोलीस ठाण्यात पोहोचला. माझ्या भावाविरुद्ध दारूची केस का करीत आहात म्हणून पोलीस उपनिरीक्षक तुतुरवाड यांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी मुखेड ठाण्यात अंकुश माचेवाड याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक यामावर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

हदगाव तालुक्यातील दत्तबर्डी तांडा नाईकनगर येथेही २ ऑक्टोबर रोजी दुपारी हदगाव ठाण्याचे पोलीस पथक अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई गेले होते. त्यावेळी मधुकर उर्फ मधु परशुराम राठोड, परशुराम रूपाजी राठोड, अनुसयाबाई परशुराम राठोड, वैभवी मधुकर राठोड, वैभव उर्फ अमर मधुकर राठोड, प्राची रोहिदास जाधव यांनी गैरकायदयाची मंडळी जमवून पोलीस पथकास शिवीगाळ करून महिला होमगार्ड यांना मारहाण करून दुखापत केली. इतकेच नव्हे तर पोलीस उपनिरीक्षक गजानन सुदाम बरगे यांनाही मारहाण करीत गंभीर दुखापत केली. उपरोक्त मंडळींनी पोलीस पथकावर हल्ला करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी बरगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हदगाव ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!