नांदेड – नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय आणि नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या तसेच नांदेड शहराला पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पातही आता महाकाय वाळू उपसा बोटी अवतरल्या आहेत. विष्णूपुरी प्रकल्पाचे दरवाजे बंद होताच प्रकल्पातून भरदिवसा वाळू उपसा करण्यास प्रारंभ झाला आहे. या वाळू माफियांना आता ना महसूल विभागाची ना पोलीस विभागाची भीती उरली आहे. कोणत्याही जलप्रकल्पातून वाळू उपसा करू नये, असे शासन नियम असले तरीही या नियमाला नांदेडमध्ये भरदिवसा पायदळी तुडवून कोट्यावधींची कमाई या वाळू माफियांकडून केली जात आहे. वाळू माफीयांना असलेल्या राजकीय वरदहस्तामुळे नांदेडची तहान भागविणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पालाच आता धोका निर्माण होण्याची परिस्थिती उद्भवली आहे.
जिल्ह्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बोटींचा वापर करून वाळू उपसा केला जात आहे. पण या महाकाय बोटी आता नांदेड शहरापर्यंत पोहोचल्या आहेत. लोहा आणि मुदखेड तालुक्यात ९ सप्टेंबर रोजी महसूल आणि पोलीस विभागाने संयुक्तरित्या कारवाई करत येळी, शंखतीर्थ, कामळज या घाटावर कारवाई करून चार मोठ्या बोटी आणि चार लहान पंप असा तब्बल एक कोटी रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला होता. या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असतानाच आणखी एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. नांदेड पोलीस मुख्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयापासून काही अंतरावर असलेल्या विष्णूपुरी प्रकल्पात भरदिवसा बोटीद्वारे वाळू उपसा सुरू करण्यात आला आहे. विष्णूपुरी प्रकल्पाचे दरवाजे आता बंद झाल्याने पाण्याचा प्रवाह थांबला आहे. प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणी असले तरीही या मोठ्या बोटीचा वापर करून थेट सक्षण पंपाने वाळू उपसा केला जात आहे. त्यामुळे थेट विष्णूपुरी प्रकल्पातूनच संपूर्ण वाळू उपसा करण्याचा गंभीर प्रकार सुरू झाला आहे.
विष्णूपुरी प्रकल्प अधिकाऱ्याकडून याबाबत वारंवार प्रशासनाला माहिती दिली जात असली तरीही त्यावर कारवाई होत नाही. परिणामी आता थेट विष्णूपुरी प्रकल्पात दिवस रात्र वाळू उपसा सुरू आहे. आगामी काळात या अवैध वाळू उपशाने प्रकल्पाला धोका उद्भवला तर त्यास जबाबदार कोण? असा प्रश्नही नांदेडकर उपस्थित करत आहेत. विष्णूपुरी प्रकल्पासह गोदावरी नदीच्या काठावरील बहुतांश गावातून आला सक्षण पंपाद्वारे आणि बोटीद्वारे उपसा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे या अवैध वाळू उपशाला आता आळा घालणार कोण याकडेही लक्ष लागले आहे.
नांदेड शहराला विष्णुपुरी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. या प्रकल्पातूनच थेट वाळू उपसा होत आहे. कोणत्याही जलप्रकल्प तसेच नदीवरील पुलापासून वाळू उपसा करू नये, असे स्पष्ट शासन निर्देश आहेत; मात्र या निर्देशांना जिल्ह्यात पायदळी तुडवले जात आहे. वाळू माफियांकडून होत असलेल्या या अवैध वाळू उपशाला रोखण्यासाठी महसूल विभाग पुढे येण्यास का धजावत नाही हा एक यक्ष प्रश्नच आहे. पोलीस विभागाला या संदर्भात माहिती दिली असता पोलीस विभागाकडून आता महसूल विभागाकडे कारवाई संदर्भात बोट दाखवले जात आहे. त्यामुळे या आगामी काळात जिल्ह्यात महसूल आणि पोलीस विभाग एकमेकांकडे बोट दाखवून वाळू माफियावरील कारवाईपासून दूर जात आहेत की काय अशीच भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात पोलीस विभागाकडून ठाणे स्तरावर एखादे वाहन पकडून कारवाईचे सत्र सुरू असल्याचे दाखवले जात आहे. महसूल विभागही पोलिसांनी एखाद्या ठिकाणी कारवाई केली तर तिथे आपली हजेरी लावत आहे. मुळाशी जाऊन अवैध वाळू उपसा रोखण्यात मात्र यश आले नाही. जिल्ह्यातील नद्यांना आलेला पूर ओसरताच आता पुन्हा एकदा वाळूमाफिया आपले बस्तान नद्यांमध्ये बसवत आहेत.
नांदेड जिल्ह्यातील एकाही वाळू घाटावर उपसा करण्यास प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली नाही. असे असले तरीही प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळेच आहे. प्रत्येक ठिकाणी आता वाळू उपसा सुरू झाला आहे. या वाळू उपशासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना हाताशी धरून नांदेड जिल्ह्यातील वाळू थेट पुण्यापर्यंत पोहोचत आहे. यातून प्रशासनाला मिळणारा कोट्यावधींचा महसूल मात्र पाण्यातच जात आहे. पर्यावरण संरक्षणासाठी नदी संवर्धन अतिशय महत्त्वाची बाब असल्याचे मानणाऱ्या आणि त्यासाठी वर्धा जिल्ह्यात पुढाकार घेणाऱ्या नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनाच आता हा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी उपायोजना कराव्या लागणार आहेत; तर अवैध माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्ह्यात ऑपरेशन फ्लश आउट सुरू करणाऱ्या पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांना पुन्हा एकदा पुढाकार घ्यावा लागणार आहे. जिल्हाधिकारी कर्डिले जोपर्यंत या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देणार नाहीत तोपर्यंत जिल्ह्यातील हा अवैध वाळू उपसा असाच सुरू राहणार आहे हे निश्चित.