
नांदेड – नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने नांदेड जिल्ह्याला ५५३ कोटी ४८ लाख ६२ हजार रुपये निधी मंजूर केला आहे. हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात ऑगस्ट २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यात एकूण ६ लाख ४८ हजार ५३३ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाल्याचा अहवाल सादर केला होता. या नुकसानीपोटी जिल्ह्याला ५५३ कोटी निधीची गरज असल्याचा अहवाल नांदेड जिल्हा प्रशासनाने सादर केला होता. त्यानुसारच जिल्ह्याला ५५३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे ७ लाख १२ हजार ६१० शेतकरी बाधित झाले होते. जिल्ह्यात जिरायत पिकांचे ६ लाख ४६ हजार २१४ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले तर १ हजार ८४२ हेक्टर क्षेत्रातील बागायती पिकांचेही नुकसान झाले आहे. जिल्ह्यात ४७६ हेक्टर क्षेत्रातील फळपिकेही या अतिवृष्टीमुळे बाधित झाले होते. जिल्ह्यात १४ हजार ५ शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे नुकसानही झाले आहे. यामध्ये ४ हजार १४६ हेक्टर क्षेत्र खरडून गेले आहे तर मातीचा थर, मलबा काढणे यासारखे नुकसान ७६० हेक्टर शेतीचे झाले आहे. यासाठीही जिल्हा प्रशासनाने २० कोटी ८१ लाखांची मागणी केली होती.
राज्य शासनाने नांदेड जिल्ह्याला ५५३ कोटी ४८ लाख रुपये मदत देण्याबाबतचा शासनादेश १८ सप्टेंबर रोजी काढला आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासन निर्णयाद्वारे निश्चित केलेल्या दरानुसार ५५३ कोटी ४८ लाख ६२ हजार रुपये निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हा निधी लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात वितरित करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. हा निधी खर्च करताना शासन निर्णयातील सूचनांचे आणि निकषांचे काटेकोर पालन करण्यात यावे आणि ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करावा असेही स्पष्ट केले आहे. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा, असेही निर्देशित करण्यात आले आहे.
माजी मुख्यमंत्री, खासदार चव्हाण यांनी मानले आभार…ऑगस्ट महिन्यात नांदेड जिल्ह्यामध्ये झालेली अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून भाजप महायुती सरकारने ५५३.४८ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या शेतकरी बांधवांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल माजी मुख्यमंत्री, खा. अशोकराव चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, अजितदादा पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन आणि पालकमंत्री अतुल सावे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत



