नांदेड जिल्हा

मंत्री राठोड म्हणतात, कर्जमाफीची मागणी सरकार वचननाम्याप्रमाणे लवकरच पूर्ण करणार

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री योग्य वेळी कर्जमाफी, ओल्या दुष्काळावर निर्णय घेतील असा नांदेडमध्ये व्यक्त केला विश्वास

नांदेड – महायुती सरकारने निवडणुकीच्या वचननाम्यात कर्जमाफीचे वचन दिले होते. सध्या आम्ही पूर परिस्थितीत ग्रामीण भागात फिरत असून शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल, असा विश्वास वाटत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कर्जमाफी, ओला दुष्काळ याबाबत सुतोवाच केले असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे महायुतीचे तिन्ही नेते योग्य वेळी निर्णय घेतील, असा विश्वास राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी काळात कर्जमाफीसह ओल्या दुष्काळाचा निर्णय मार्गी लागेल असे स्पष्ट होत आहे.

ओल्या दुष्काळावर बोलताना मंत्री राठोड म्हणाले, नांदेड जिल्ह्यातील बहुतांश महसूल मंडळात वारंवार अतिवृष्टी झाली आहे. आगामी काळातही पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहेच. त्यामुळे सध्या शेतीचे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी पुरामुळे नुकसान झाले आहे. पुढेही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. अतिवृष्टी आणि पुरामुळे ऊस, हळद, केळी, कापूस, सोयाबीन या पिकांच्या उत्पादनामध्ये मोठी घट होणार आहे. या सर्व संकटाच्या काळात शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्याची आज खरी गरज आहे. यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी पुढे येत असून शेतकऱ्यांना कुठेही खचून जाऊ नका असा धीर देत आहोत. आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत, अशी भूमिका घेतली आहे. याच दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कामे बाजूला ठेवून मंत्र्यांना बांधावर जाण्याचे आदेश दिले आहेत. पूर परिस्थितीची पाहणी करत स्वतः मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्रीही सामान्य शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांची भूमिका आहे समजून घेत आहेत. आम्हीही शेतकऱ्यांची मुलच आहोत. आमचे शेतकरी हे वडीलधारी आहेत. आम्ही सरकारमध्ये आहोत, त्यांच्यासाठी काही तरी करणे, त्यांना मदत करणे ही आमची जबाबदारी आहे. त्यासाठी आम्ही सरकार म्हणून पुढे आलो आहोत. या पाहणीनंतर आता थेट आगामी कॅबिनेट बैठकीत याबाबत अहवाल सादर केला जाईल. त्या अहवालावर मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील, असेही जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार बाबुराव कदम कोहळीकर आ. बालाजी कल्याणकर, आमदार आनंद बोंढारकर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

तत्पूर्वी जलसंधारण मंत्री राठोड यांनी नांदेड जिल्ह्यातील हदगाव, अर्धापूर, नांदेड आणि लोहा तालुक्यात पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्यातील पूर परिस्थिती, अतिवृष्टी तसेच मदतीचा आढावा त्यांनी घेतला.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या कामाचे केले कौतुक…जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती या काळात केलेल्या कार्याचे कौतुक केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन परिस्थिती अगदी व्यवस्थितरित्या  हाताळली आहे. मदत, नुकसान भरपाई तसेच इतर बाबींचे शासनाला वेळोवेळी प्रस्तावही पाठविले आहेत. उर्वरित बाबींचीही त्यांच्याकडून तयारी पूर्ण झाली आहे. काही बाबतीत त्यांनी  स्वतः निर्णय घेतले आहेत. ही बाबही कौतुकाचे असल्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी स्पष्ट केले. एकूणच राठोड यांनी गुरुवारच्या नांदेड दौऱ्यात जिल्हाधिकारी कर्डिले यांच्या कार्यपद्धती आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!