
नांदेड – जिल्ह्यात महापुराची स्थिती रविवारीही कायम आहे. या महापुरात भोकर तालुक्यात एका व्यक्तीचा नाल्याच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात हा पुराचा २५ वा बळी ठरला आहे. यापूर्वी २४ जणांचा वेगवेगळ्या कारणामुळे अतिवृष्टी व पूरकाळात मृत्यू झाला होता. जिल्ह्यातील या महापुराच्या स्थितीचा रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडून आढावा घेतला. आवश्यक ती सर्व मदत जिल्ह्याला दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. मन्याड नदीच्या पुरामुळे अकोला- नांदेड – हैदराबाद हा महामार्ग शनिवारी दुपारी तीन वाजल्यापासून बंद आहे. जवळपास पाच ते सहा किलोमीटर वाहनांच्या रांगा दोन्ही बाजूने लागल्या आहेत.
भोकर तालुक्यात माळसापुर, पाळज येथील लक्ष्मीनारायण लच्छमना पुस्पुलवाड (वय ४५) हे गावाजवळून वाहणाऱ्या एका नाल्याच्या पाण्यात शनिवारी वाहून गेले. त्यांचा मृतदेह आज रविवारी सकाळी सापडला आहे. गोदावरी नदीत विष्णुपुरी प्रकल्पातून ३ लाखाहून अधिक क्युसेस विसर्ग सुरूच आहे. परिणामी शहरातील अनेक भागात गोदावरीचे पाणी शिरले आहे. नांदेड शहरातील ९७० नागरिकांना निवारा केंद्रात हलवण्यात आले आहे. ग्रामीण भागातही नदी नाल्यांना पूर आला असून एक हजाराहून अधिक नागरिकांना तात्पुरत्या निवारा केंद्रात हलवण्यात आले आहे.
जिल्ह्यात २८ सप्टेंबर रोजी १३ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. २७ सप्टेंबर रोजीही एकूण ९३ पैकी २५ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली होती. नांदेड जिल्ह्यात राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकडीकडून तसेच नांदेड शहरात महानगरपालिकेच्या अग्निशमन पथकाकडून शोध आणि बचाव कार्य केले जात आहे. नांदेड शहरात गोदावरी नदी सध्या ३५३.८७ मीटर या धोका पातळीजवळ पोहोचली आहे. विष्णूपुरी प्रकल्पाचे १७ दरवाजे उघडण्यात आले आहेत. नांदेड शहरातील खडकपुरा, दूल्हेशाह रहमान नगर, जीएम कॉलनी, गाडीपुरा, काला पूल परिसर, गंगाचाळ, भीमघाट, नावघाट, मल्ली परिसर, बिलाल नगर, पाकीजा नगर, शंकर नगर, वसरणी आधी सखल भागातील वस्त्यांमध्ये गोदावरी नदीचे पाणी शिरले आहे. नावघाट पूल वाहतुकीसाठी बंद आहे. गोदावरी नदी आणि आसना नदी काठावरील भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नांदेड तालुक्यातील पुणेगाव येथे गोदावरी नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने नांदेड – मुदखेड रस्ता बंद झाला आहे. कंधार तालुक्यात बहाद्दरपुरा ते फुलवळ हा रस्ता पुरामुळे बंद आहे. लोहा तालुक्यात बेटसांगवी – शेवडी, पेनूर – शेवडी हा रस्ताही बंद झाला आहे. बिलोली तालुक्यात नागणी ते माचनूर हा रस्ता पूर्णपणे बंद आहे. नायगाव तालुक्यातील अनेक रस्ते बंद आहेत. त्यात आज राहेर पूलही बंद पडला आहे. बरबडा ते अंतरगाव हा रस्ता ही बंद झाला आहे. नायगाव आणि धर्माबादला जोडणाऱ्या राहेर येथील गोदावरी नदीवरून पुराचे पाणी जात असल्याने सदर पूल वाहतुकीसाठी रविवारी सकाळी सात वाजेपासून बंद करण्यात आला आहे. धर्माबाद तालुक्यात शिरजखेड ते धर्माबाद रस्ता सध्या बंद असून शेळगाव थडी ते मोकली थडी, माष्टी ते शेळगाव थडी हे रस्ते बंद आहेत. उमरी तालुक्यातील महाटीलगतचा एक पूल पाण्याखाली गेला आहे. मुदखेड तालुक्यात आमदुरा रस्ता बंद झाला आहे. हदगाव तालुक्यातील धानोरा, निवघा, पिंपरखेड, बाबळी, बोरलेगाव या गावांचा संपर्क तुटलेला आहे. मनूला या गावचाही संपर्क तुटला असून गोरलेगाव, बाभळी, पंचोली, हरड, भानेगाव, वाटेगाव या गावालगत पैनगंगा आणि कयाधू नदीचे पाणी आले आहे. पिंपरखेड मारलेगाव या पुलावर पाणी आल्यामुळे वाहतूक बंद झाली आहे.
अकोला- नांदेड – हैदराबाद हा महामार्ग शनिवारी दुपारी तीन वाजेपासून बंद झाला आहे. देगलूर तालुक्यातील टाकळी ते वझरगादरम्यान टाकळी गावात मन्याड नदीचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने रस्ता बंद झाला आहे. देगलूर आणि नांदेडच्या दिशेने पाच ते सात किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. परिसरातील अनेक गावात पुराचे पाणी शिरले असून शेतीही संपूर्णतः पाण्याखाली गेली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रविवारी नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडून नांदेड जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. नांदेड जिल्ह्यात २७ सप्टेंबर रोजी २३ तर २८ सप्टेंबर रोजी १३ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. गोदावरी, मांजरा, मन्याड नद्यांच्या लाभक्षेत्रात पूरस्थिती निर्माण झाली. जिल्ह्यात ६७ लोकांना सुरक्षित वाचवण्यात आले आहे. नांदेडमध्ये ३०४ आणि लोहामध्ये १२० लोकांना मदत शिबिरात ठेवण्यात आले असून, त्यांना सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत. एकूण १६ मदत शिबिरे तयार करण्यात आली आहेत. ५६ घरांची पडझड झाली असून, त्यांना तातडीने मदत देण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आली.



