
नांदेड – नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात रायवाडी शिवारात कापसाच्या शेतीमध्ये गांजाची झाडे लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेतामधील ५० ते ६० झाडाच्या फांद्या कापून विक्रीसाठी ठेवलेल्या स्थितीत असताना स्थानिक गुन्हा शाखेने बुधवारी छापा टाकून तब्बल ६ लाख ८३ हजार रुपयांचा ६८ किलो ३४० ग्राम वजनाचा गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी लोहा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
जिल्ह्यात ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय हे उपनिरीक्षक महेश कोरे आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदारांसह कारवाईसाठी कंधार उपविभागामध्ये पेट्रोलिंगसाठी रवाना झाले होते. त्यावेळी १९ नोव्हेंबर रोजी पथकातील अधिकारी आणि अंमलदारांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली, लोहा तालुक्यातील रायवाडी शिवारात नामदेव माणिका मोरे वय ६० वर्ष याने त्याच्या कापसाच्या शेतीमध्ये गांजाची झाडे लावून त्याची शेती केली आहे. तो गांजा विक्री करण्यासाठी कापूनही ठेवला आहे. ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक महेश कोरे आदींनी रायवाडी येथे मोरे याच्या शेतात छापा मारला. त्यावेळी शेतामध्ये अंदाजे ५० ते ६० झाडांच्या फांद्या कापून विक्री करण्यासाठी ठेवलेल्या सापडल्या. या सर्व गांजाच्या फांद्या जप्त करून नामदेव मोरेविरुद्ध लोहा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
ही कामगिरी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक महेश कोरे, पोहेकॉ विठ्ठल शेळके, सुनीलदत्त गटलेवार, दिलीपकुमार चंचलवाड, पोकॉ माधव माने, संघरत्न गायकवाड, श्रीराम दासरे, उमर शेख, धम्मा जाधव, सुधाकर देवकते, भीमराव लोणे या स्थानिक गुन्हा शाखेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली आहे. या कामगिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी कौतुक केले आहे.



