राजकीय

नांदेडमध्ये महापालिका निवडणुकीत काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी एकत्र

काँग्रेस ६१ तर वंचित २० जागा लढवणार, महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षाकडून कोणताही प्रस्ताव नाही - काँग्रेस निरीक्षक माणिकराव ठाकरे 

नांदेड – महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आल्याची घोषणा मंगळवारी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक माणिकराव ठाकरे, खासदार प्रा. रवींद्र चव्हाण, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्यासह वंचितचे शहराध्यक्ष प्रशांत इंगोले यांनी केली. या निवडणुकीत काँग्रेस ६१ तर वंचित बहुजन आघाडी २० जागा लढणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार राज्यात वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र यावे असे आदेश देण्यात आले आहेत. त्याच्या अनुषंगाने मुंबईनंतर नांदेडमध्येही काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आली आहे जागा वाटपाचा फार्मूलाही निश्चित करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसापासून या बाबत चर्चा वाटाघाटी सुरू होत्या. रात्री उशिरापर्यंत वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या आघाडीवर एकमत झाले आहे मंगळवारी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतचे घोषणा केली. धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होऊ नये यासाठी काँग्रेस आणि वंचित एकत्र येणे गरजेचे होते. त्यासाठीच ही आघाडी झाल्याचे यावेळी सांगितले. भाजपचे नेते माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्याकडून तोडा, फोडा आणि निवडणूका जिंका हे धोरण असल्याचे सांगितले. काँग्रेसच्या मतांचे विभाजन करण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट स्वतंत्र निवडणुका लढत आहे. हाही भाजपचाच एक डाव असल्याचे ठाकरे म्हणाले.

त्याचवेळी काँग्रेसने महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याने आघाडी बाबत कोणतेही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे त्यामुळे आता या महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच एकत्र लढणार हे स्पष्ट झाले आहे. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, हनुमंत पाटील बेटमोगरेकर यांचीही यावेळी उपस्थिती होती.

जागा वाटपावरून वंचित बहुजन आघाडीच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये पत्रकार परिषदेदरम्यानच असंतोष दिसून आला. काँग्रेसचे पक्ष निरीक्षक माणिकराव ठाकरे यांनाच वंचित बहुजन आघाडीचे निवडणूक प्रभारी अविनाश भोसीकर यांनी पत्रकारांसमक्ष सुनावले. जागा वाटपात निश्चित झाल्याप्रमाणे झाले पाहिजे अन्यथा आम्हीही सर्वच जागी उमेदवार उभे करू असे स्पष्ट केले. यावेळी काँग्रेसचे इतर पदाधिकारी अवाक् झाले. पक्ष निरीक्षकानाच सुनावत असताना कुणीही काहीही बोलू शकले नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापर्यंत ही धुसफूस अशीच सुरू राहिल असेच चित्र आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!