क्राईम

नांदेडमध्ये शेती नावावर लावण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेणारा तलाठी चतुर्भुज

नायगाव तालुक्यातील कृष्णूर सज्जाचे तलाठी लाचेच्या सापळ्यात अडकला, घरझडतीही सुरू

नांदेड – वडीलोपार्जित शेती वारसा हक्काने नावावर लावण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या नायगाव तालुक्यातील कृष्णूर सज्जाचे तलाठी अशोक दिगंबर गिरी याला लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सकाळी नायगाव तहसील कार्यालयासमोर रंगेहाथ पकडले.
कृष्णूर येथील एका तक्रारदाराची वडीलोपार्जित शेती कृष्णूर येथे गट क्रमांक ११६, १४६ व ४०७ मध्ये २ हेक्टर २१ आर आहे. त्या शेतीची त्यांचे वडिलांचे नावे वारसा हक्काने सातबारावर नोंद करण्यासाठी तलाठी अशोक गिरी याने २० हजार रूपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाच लूचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला. या तक्रारीवरून लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सकाळी नायगाव तहसील कार्यालयासमोर सापळा रचला. त्यात तलाठी गिरीने नायगाव तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर पंचासमक्ष २० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती १० हजार रुपये घेऊन काम करण्यास मान्यता दिली. तलाठी सज्जा कार्यालय नायगाव येथे  तक्रारदाराकडून वडिलांचे नावाने वारसा हक्क आधारे शेत जमिनीची सातबारावर नोंद करण्यासाठी सकाळी ११.३० वाजे दरम्यान शासकीय पंचासमक्ष १० हजार रूपये लाच रक्कम स्वतः स्विकारली आहे.

या कारवाईदरम्यान तलाठी गिरीकडून रोख १६६० रुपये, मोबाईल, आधार कार्ड, पॅन कार्ड आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्याच्या घराची झडती घेण्यात येत आहे. याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक साईप्रकाश चन्ना यांच्या तक्रारीवरून भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तपास अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक राहुल तरकसे हे काम पाहत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!