महापालिका

नांदेड शहरात अवैध बॅनर विरोधात महापालिका उतरली रस्त्यावर

सहा क्षेत्रिय अधिकाऱ्यांसह इमारत निरीक्षकांना बजावली नोटीस, उपायुक्त अजितपालसिंघ संधू स्वतः कारवाईसाठी उतरले रस्त्यावर

नांदेड – नांदेड शहरात अवैध बॅनरचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाल्यानंतर अखेर महापालिका रस्त्यावर उतरली आहे. अवैध बॅनरवरून शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त झाली होती. याबाबत शहरातील सर्व सहा क्षेत्रिय अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. इमारत निरीक्षकांकडूनही याबाबत खुलासा मागवण्यात आला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुरुवारी सकाळी उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांनी आपल्या अतिक्रमणविरोधी पथकासह रस्त्यावर उतरत कारवाई सुरू केली आहे.

नांदेड शहर वेगवेगळ्या राजकीय पक्षांसह आता सामाजिक संघटना, स्वयंघोषित नेते, पदाधिकारी यासोबत व्यावसायिकांकडूनही मोठ्या प्रमाणात अनधिकृत बॅनर लावले जात आहेत. त्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात भावी आणि इच्छुकांनीही अनधिकृत बॅनरच्या माध्यमातून आपला प्रचार सुरू केला होता. त्यात रस्त्यांच्या मधोमध असलेल्या विद्युत पोलवरही बॅनर लावले जात होते. ग्रामीण भागातील नेतेही नांदेड शहरात अवैध बॅनरबाजी करण्यात मागे राहिले नव्हते. या बॅनरमुळे वाहनधारकांच्या जीवितासही धोका निर्माण झाला होता. शहरात अनधिकृत लावलेले बॅनर काढण्यासाठी महापालिकेने क्षेत्रिय अधिकाऱ्यांना अंमलबजावणी अधिकारी म्हणून अधिकार दिले आहेत; मात्र अवैध बॅनर काढण्याची तसदी हे क्षेत्रिय अधिकारी घेतच नव्हते. परिणामी अवैध बॅनरची संख्या दिवसेंदिवस वाढतच होती. यातून शहर विकृतीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे.

विशेष म्हणजे अवैध बॅनर विरोधात कारवाई करण्यासाठी न्यायालयाचेही आदेश आहेत. या आदेशाच्या अंमलबजावणीकडेही क्षेत्रिय अधिकारी दुर्लक्षच करत होते. परिणामी परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता होती. हीच बाब लक्षात घेऊन आज गुरुवारी महापालिकेने सकाळीच कारवाईला प्रारंभ केला आहे. महापालिकेचे उपायुक्त अजितपालसिंघ संधू, अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे, वजीराबादचे क्षेत्रिय अधिकारी गौतम कवडे, दक्षिणचे पथक प्रमुख विशाल सोनकांबळे, उत्तरचे पथक प्रमुख चौंदते यांच्या मार्गदर्शनाखाली वजीराबाद चौरस्ता ते कला मंदिरपर्यंत अनधिकृत बॅनर काढून टाकले आहेत.

आता थेट गुन्हे दाखल केले जातील – अजितपालसिंघ संधू शहरात अनधिकृत बॅनरची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. परिणामी शहरातील अनेक नागरिकांनी या संदर्भात महापालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. जिल्हा पोलीस दलाकडूनही याबाबत महापालिकेला कळविण्यात येत होते. या सर्व तक्रारींची दखल घेत अवैध बॅनरविरुद्ध कारवाई न करणाऱ्या सहा क्षेत्रिय अधिकाऱ्यांसह इमारत निरीक्षकांनाही याबाबत नोटीस बजावल्या आहेत. आता शहरात महापालिकेच्या परवानगीशिवाय बॅनर लावता येणार नाही. लावणाऱ्याविरुद्ध थेट गुन्हे दाखल केले जातील अशी माहिती, महापालिका उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!