अपघात

नांदेड जिल्हा परिषदेच्या पंतप्रधान सडक योजना कार्यालयाजवळ आग..! शहरात आगीच्या चार घटना

फटाक्यामुळे शक्तीनगर, बाफना रोड येथे लागलेल्या आगीत आठ लाखांचे नुकसान, महावीर चौकातील सत्कार लॉजलाही आग 

नांदेड – नांदेड जिल्हा परिषदेच्या पंतप्रधान सडक योजना कार्यालयाजवळ आग लागल्याने एकच संशयकल्लोळ निर्माण झाला. मात्र कार्यालयाजवळ असलेल्या कचरा आणि लाकडांना ही आग लागल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सुरू असलेल्या वेगवेगळ्या चर्चा बंद झाल्या. नांदेड शहरात बुधवारी रात्री आगीच्या तीन घटना घडल्या. या आगीमध्ये एका दुकानातील सहा ते सात ते आठ लाखांचे साहित्य जळाले आहे. तर अग्निशमन दलाच्या तत्परतेने या दुकानातील जवळपास पाच लाखांचा जागेपासून बचावला आहे.

गुरुवारी सकाळी नांदेड जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या पंतप्रधान सडक योजना कार्यालयाजवळून आगीचे लोट दिसू लागले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शनी अग्निशमन विभागाला दिली. नांदेड महापालिका अग्निशमन विभागाचे उप अग्निशमन प्रमुख निलेश कांबळे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली; मात्र घटनास्थळी पंतप्रधान सडक योजना कार्यालयाजवळील कचरा आणि लाकडांना आग लागली होती. काही वेळातच ही आग अग्निशमन दलाने आटोक्यात आणली. बाजूलाच असलेल्या पंतप्रधान सडक योजना कार्यालयातील महत्त्वाच्या संचिका आणि कागदपत्रांना सुरक्षित ठेवण्यात यश आले. त्यामुळे आगीच्या घटनेच्या अनुषंगाने सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चा पाहता सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.

बुधवारी सायंकाळी सात वाजेदरम्यान शक्तीनगर बाफना रोड येथे एका दुकानाला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तेथे धाव घेतली. दोन दुकानामध्ये कपडा, कागदी ग्लास, कागदी प्लेट व इतर साहित्यांना आग लागली होती. सर्वप्रथम दोन्ही शटर बंद असल्याकारणाने वाहनाच्या विंचच्या साह्याने शटर ओढून काढण्यात आले. नंतर डिलिव्हरी होजद्वारे आगीवर पाणी मारून आग आटोक्यात आणली. पण शटरमध्ये खूप जास्त प्रमाणात माल असल्याकारणाने आतमध्ये उष्णता होती. साहित्य काढण्यास अडचण होत होती. त्यामुळे त्या ठिकाणी महानगरपालिकेची जेसीबी बोलावून सर्व माल बाहेर काढण्यात आला. आग पूर्णपणे विझवण्यात आली. आगीसंदर्भात संतोष रामचंद्र अग्रवाल या दुकान मालकाने सांगितले, ही आग फटाक्यामुळे लागली. आगीमध्ये ७ ते ८ लाखाचे नुकसान झाले आहे. महानगरपालिका अग्निशमन विभाग तात्काळ पोहोचल्यामुळे दुकानातील पाच लाखांचे साहित्य वाचवले आहे.

बुधवारी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान महावीर चौक येथे असलेल्या सत्कार लॉजच्या गच्चीवर टाकाऊ वस्तुंना फटाक्याच्या आतिषबाजीमुळे आग लागली होती. ती आग अग्निशमन विभागाने वेळेत जाऊन विझवली. या घटनेत कोणतेही नुकसान झाले नाही. हबीब टॉकीजजवळील नेट केबलला लागलेली आगही विझवण्यात आली. यामध्ये नेट केबल व्यतिरिक्त इतर कुठलेही नुकसान झाले नाही.

नांदेड शहरात बुधवारी आणि गुरुवारी लागलेल्या आगी आगीवर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम व उपायुक्त नितीन गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अग्निशमन अधिकारी निलेश कांबळे, गायकवाड, साजिद, पवळे, गीते, नरवाडे, वाहन चालक तोटावर, नरवाडे यांनी यशस्वीपणे नियंत्रण मिळवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!