
नांदेड – महायुती सरकारने निवडणुकीच्या वचननाम्यात कर्जमाफीचे वचन दिले होते. सध्या आम्ही पूर परिस्थितीत ग्रामीण भागात फिरत असून शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल, असा विश्वास वाटत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कर्जमाफी, ओला दुष्काळ याबाबत सुतोवाच केले असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे महायुतीचे तिन्ही नेते योग्य वेळी निर्णय घेतील, असा विश्वास राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी काळात कर्जमाफीसह ओल्या दुष्काळाचा निर्णय मार्गी लागेल असे स्पष्ट होत आहे.
तत्पूर्वी जलसंधारण मंत्री राठोड यांनी नांदेड जिल्ह्यातील हदगाव, अर्धापूर, नांदेड आणि लोहा तालुक्यात पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्यातील पूर परिस्थिती, अतिवृष्टी तसेच मदतीचा आढावा त्यांनी घेतला.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या कामाचे केले कौतुक…जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती या काळात केलेल्या कार्याचे कौतुक केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन परिस्थिती अगदी व्यवस्थितरित्या हाताळली आहे. मदत, नुकसान भरपाई तसेच इतर बाबींचे शासनाला वेळोवेळी प्रस्तावही पाठविले आहेत. उर्वरित बाबींचीही त्यांच्याकडून तयारी पूर्ण झाली आहे. काही बाबतीत त्यांनी स्वतः निर्णय घेतले आहेत. ही बाबही कौतुकाचे असल्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी स्पष्ट केले. एकूणच राठोड यांनी गुरुवारच्या नांदेड दौऱ्यात जिल्हाधिकारी कर्डिले यांच्या कार्यपद्धती आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेचे कौतुक केले.



