क्राईम

नांदेडमध्ये खंडणी, अपहरणातील गुन्हेगारास गोळी झाडून केले पोलिसांनी जेरबंद..!

पोलिसांनी घातला घराला वेढा, छतावर लपला होता आरोपी, गब्याने गावठी पिस्टलने केली होती फायर करण्याची तयारी

नांदेड – खंडणी, अपहरण, विनापरवाना पिस्टल बाळगणे यासारख्या गंभीर गुन्ह्यातील पाहिजे असलेला रबजोतसिंग उर्फ गब्या जसविंदरसिंग तिवाना याला स्थानिक गुन्हे शाखा आणि वजीराबाद पोलिसांनी संयुक्त कारवाई करत १५ नोव्हेंबरच्या रात्री गोळी घालून त्याच्या राहत्या घरातून जेरबंद केले.
पोलिसांना वेगवेगळ्या गुन्ह्यात हवा असलेला रबजोतसिंग उर्फ गब्या जसविंदरसिंग तिवाना हा त्याच्या राहत्या घरी निधानसिंग कॉलनी, भगतसिंग रोड येथे आला असल्याची गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली.  वजीराबाद, विमानतळ ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेला गब्या हा धोकादायक असल्याचे स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल घोगरे यांना माहीत होते. घोगरे यांनी वजीराबाद ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आरसेवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक बोयणे यांच्या पथकाला बोलावले. गब्याच्या घराची दोन पंचासमक्ष पाहणी करत असताना गब्या हा त्याच्या घराच्या छतावर असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी गब्याच्या घराला वेढा घातला. वजीराबाद येथील अंमलदार गणेश धुमाळ हे घराच्या छतावर जाऊन त्याचा शोध घेत असताना गब्याने त्याच्या ताब्यातील गावठी पिस्टल पोलीस अमलदार धुमाळ यांच्या दिशेने ताणून धरले इतकेच नव्हे तर जीवे मारण्याच्या उद्देशाने फायर करण्यासाठी त्याने पिस्टल कॉक केली असता पोलीस अंमलदार गणेश धुमाळ यांनी स्वतःच्या बचावासाठी त्यांच्या सरकारी ऑफिस पिस्टलने आरोपीच्या पायावर गोळी मारली. त्यावेळी गब्या स्वतःच्या बचावासाठी खाली वाकला असता सदर गोळी त्याच्या कमरेला लागली आहे. आरोपी गब्या हा पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही कारवाई नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आरसेवार, सहायक पोलीस निरीक्षक बोयणे, स्थानिक गुन्हा शाखेतील पोकॉ साहेबराव कदम, राजू बोधगिरे, विठ्ठल वैद्य, गोविंद राठोड, अकबर पठाण राजकुमार डोंगरे, विश्वनाथ पवार तसेच वजीराबाद पोलीस ठाण्यातील हबीब चाऊस, रमेश सूर्यवंशी ज्वालासिंग बावरी, गणेश धुमाळ यांनी केली आहे. ही कामगिरी करणाऱ्या स्थानिक गुन्हा शाखेचे, खंडणी विरोधी पथकाचे, वजीराबाद पोलीस ठाण्यातील अधिकारी, अंमलदारांचे जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी कौतुक केले आहे.

जिल्हा पोलिसांनी दिला इशारा…                        जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात आले आहे, वेगवेगळ्या गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या, फरारी असलेल्या, वॉरंटमधील आरोपींनी लपून छापून राहणे, पळून जाणे यापेक्षा पोलिसांसमोर शरणागती पत्करणे त्यांच्यासाठी योग्य राहील.  तरुणांनी कोणत्याही गुन्हेगारी टोळ्या बनवू नये अथवा कोणत्या गुन्हेगारी टोळीमध्ये शामिल होऊ नये अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!