Police

नांदेड जिल्ह्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या ठाण्याचे दोन पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात..!

पोलीस दलाच्या ठाणे स्तरावरील कारभाराचे पितळ उघडे, आता वरिष्ठांकडून होणाऱ्या कारवाईकडे लक्ष

नांदेड – नांदेड जिल्ह्यात मंगळवारी एकाच दिवशी वेगवेगळ्या ठाण्याचे दोन पोलीस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. सोनखेड आणि रामतीर्थ ठाण्यातील दोन पोलिसांसह एका खाजगी व्यक्तीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच दिवशी झालेल्या या कारवाईमुळे पोलीस दलाच्या ठाणे स्तरावरील कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. त्यामुळे या कारभारावर आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून कोणती पावले उचलली जातात याकडेही जनतेचे लक्ष लागले आहे.

लोहा तालुक्यातील जवळा येथे तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे २० गुंठे शेत जमीन आहे. त्या शेत जमिनीत १३ नोव्हेंबर रोजी शेजाऱ्यांनी प्रवेश करून शेतात लावलेली तुर उपटून टाकली. त्या ठिकाणी ज्वारी पेरणी करू लागले. त्यावेळी तक्रारदार यांचा भाऊ आणि वडील हे शेतात गेले असता त्यांच्यामध्ये वाद होऊन हाणामारी झाली. त्याबाबत १७ नोव्हेंबर रोजी सोनखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्या शेत शेजाऱ्यावर गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गणपत गीते यांच्याकडे आहे. विरोधी पार्टी यांच्या तक्रारीवरून तक्रारदार यांचे वडील आणि भावावरही सोनखेड येथे एनसी दाखल आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक गीते यांनी तक्रारदार यांना गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि विरोधकांवर कारवाई करण्यासाठी २० हजार रुपये मागणी केली होती. त्यावेळी नाईलाजास्तव तडजोडी अंती तक्रारदाराने गीते यांना १० हजार रुपये दिले होते. २० नोव्हेंबर रोजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गीते यांनी तक्रारदार यांना सोनखेड पोलीस ठाण्यात बोलवून विरोधातील लोकांवर कारवाई करण्यासाठी तसेच तक्रारदारावर दाखल केला असलेल्या एनसीमध्ये मदत करण्यासाठी आणखी दहा हजार रुपये मागितले. याप्रकरणी तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

या तक्रारीवरून २५ नोव्हेंबर रोजी सोनखेड पोलीस ठाण्यात तक्रारदार यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील लोकांवर कारवाई करण्यासाठी तसेच तक्रारदार यांना मदत करण्यासाठी शासकीय पंचायत समक्ष १० हजार रुपये लाचेची मागणी स्वतः गीते यांनी केली. तडजोडी अंती पाच हजार रुपये घेण्यास सहमती दिल्याचे पडताळणी दरम्यान निष्पन्न झाले. २५ नोव्हेंबर रोजी सोनखेड पोलीस ठाण्यात शासकीय पंचासमक्ष गीते याने ५ हजार रुपयाची लाच स्वतः स्वीकारली. या कारवाईनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गीते यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे रोख १५ हजार रुपये, एक तोळ्याची गळ्यातील सोन्याची चैन, दोन सोन्याच्या अंगठ्या, पाच ग्रामची चांदीची अंगठी, घड्याळ आणि मोबाईल जप्त केला आहे. गीतेच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणी सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. हा सापळा पोलीस निरीक्षक करीम खान सालार खान पठाण यांनी रचला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक माधुरी यावलीकर यांच्याकडे सोपवला आहे.

अन्य एका कारवाईत रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दशरथ खंडेराव जांभळीकर आणि अन्य एका खाजगी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २१ नोव्हेंबर रोजी तक्रारदार हे पत्ते खेळत असताना सहायक पोलीस उपनिरीक्षक जांभळीकर यांना आढळून आले. त्यांच्यावर पोलीस स्टेशन रामतीर्थ येथे जुगाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक पोलीस उपनिरीक्षक जांभळीकर यांनी सदर गुन्ह्यांमध्ये पीसीआर न घेता तपासात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे १० हजार रुपये लाचेची मागणी केली होती तसेच खाजगी इसम अमजत पठाण याने तक्रार यांना फोनवर सांगितले, मला ३० हजार रुपये दिले असते तर तुमचे सर्व गुन्हे मी अंगावर घेतले असते. मी जांभळीकर साहेबांना सांगतो, तक्रारदार येत आहेत. त्यांना पैसे देऊन टाका असे म्हणून लाच देण्यास प्रोत्साहन दिले. २२ नोव्हेंबर रोजी पोलीस स्टेशन रामतीर्थ येथे तक्रारदार यांच्यावर दाखल असलेल्या जुगाराच्या गुन्ह्यामध्ये पीसीआर न घेता तपासात मदत करण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जांभळीकर यांनी तक्रारदाराकडे शासकीय पंचासमक्ष १० हजार रुपये लाचेची स्वतः मागणी केली आणि लाचेची रक्कम स्वीकारण्यास सहमती दिली. खाजगी इसम अमजद पठाण याने तक्रारदाराला फोनवर जांभळीकर यांना लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे पडताळणी दरम्यान निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी २३ आणि २४ नोव्हेंबर रोजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जांभळीकर यांच्यावर सापळा कारवाई करण्यासाठी तक्रारदार यांना पाठवले; परंतु जांभळीकर याला तक्रारदार यांचा संशय आल्याने त्यांनी लाच घेतली नाही. याप्रकरणी लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जांभळीकर यांच्या घराची झडती प्रक्रिया ही सुरू आहे. याप्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीचे पोलीस निरीक्षक साईप्रकाश नरसिंगराव चन्ना यांनी हा सापळा रचला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अनिता दिनकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

एकाच दिवशी झालेल्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे नांदेड जिल्हा पोलीस दलाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे ठाणे स्तरावर होत असलेल्या कारभाराचे पितळ हे उघडे पडले आहे आता या सर्व प्रकारावर जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!