महापालिका

नांदेड महापालिकेच्या कौठा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यास बेदम मारहाण 

परिचारिकेच्या कुटुंबियांकडून झाली जबर मारहाण, महापालिकेकडून आठ दिवसानंतरही कारवाई नाही,  पोलीस ठाण्यामध्येही ना अर्ज ना फिर्याद..!

नांदेड – नांदेड महापालिकेच्या कौठा येथील रुग्णालयात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यास त्याच रुग्णालयातील कार्यरत एका परिचारिकेच्या नातेवाईकाकडून बेदम मारहाण झाल्याचा प्रकार आठ ते दहा दिवसांपूर्वी झाला. हा प्रकार रविवारी समाजमाध्यमातून उघडकीस आला आहे. त्याचवेळी  महापालिका आरोग्य विभागाला हा सर्व प्रकार माहिती असला तरीही अद्याप चौकशीच्या नावाखाली या प्रकरणात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या प्रकरणाचे गौडबंगाल अद्यापही कायमच आहे. हे प्रकरण महापालिकेच्या महिला तक्रार निवारण समितीकडे सोपविण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरीही अद्यापही या समितीकडे मूळ संचिका देण्यात आली नसल्याची माहिती पुढे आली आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागात वर्षानुवर्ष वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ठाण मांडले आहे. या अधिकाऱ्यांना हटविण्याचे धाडस महापालिका अधिकाऱ्यांनी दाखवले नाही. त्यामुळे हे वैद्यकीय रुग्णालय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे गड झाले आहेत. या गडामध्ये चाललेला कारभार नेमका कसा सुरू आहे याबाबत स्थानिकांनी अनेकवेळा तक्रार केल्या आहेत; मात्र त्या तक्रारीकडे महापालिकेकडून कानाडोळाच करण्यात आला आहे. त्यातच आता कौठा रुग्णालयात एका परिचारिकेच्या नातेवाईकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यास कार्यालयातच येऊन बेदम मारहाण केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून परिचारिकेला त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा जाब विचारण्यास गेलेल्या नातेवाईकांनी मनपा वैद्यकीय अधिकाऱ्याला कार्यालयातच खुर्चीवर बेदम मारहाण केली; मात्र ही घटना उलटून ८ ते १० दिवस झाले आहे. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात ना वैद्यकीय अधिकाऱ्याने तक्रार केली ना त्या परिचारिकेने वैद्यकीय अधिकाराविरुद्ध अर्ज दिला. त्यामुळे या प्रकरणात सध्या तरी नांदेड ग्रामीण पोलीसही अनभिज्ञच आहेत.

महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता या प्रकरणाबाबत गेल्या आठ दिवसापासून चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणात लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सदर परिचारिकेच्या तक्रारीबाबत महिला तक्रार निवारण समितीकडे हा विषय सोपविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. नुकतीच महापालिकेत महिला तक्रार निवारण समितीची बैठकही झाली; मात्र त्या बैठकीत सदर प्रकरणाची संचिकाच सादर झालेली नाही. त्यामुळे मूळ विषय महिला तक्रार निवारण समितीपर्यंत पोहोचलाच नाही. त्यामुळे महिला तक्रार निवारण समिती कोणत्याही निष्कर्षाप्रत आली नाही, कोणती कारवाई झाली नसल्याचेही पुढे आले आहे.

एकूणच महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून वैद्यकीय अधिकाऱ्याचा बचाव केला जात आहे का..?  याबाबतही  चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे घटनेनंतर त्या वैद्यकीय अधिकाऱ्याची अथवा परिचारिकेची बदली अथवा या दोघांवरही प्रशासकीय कारवाई झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूणच महापालिकेचा हा कारभार रविवारी समाज माध्यमातून उघडकीस आला आहे. या प्रकरणात दोन्हीही गट पोलीस ठाण्यात मात्र अद्याप पोहोचले नाहीत, हेही विशेष. महापालिकेच्या सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात हात वर केले आहेत. कारवाई वरिष्ठ करतील असेच सांगण्यात येत आहेत. त्यामुळे ते वरिष्ठ नेमके कोण आहेत आणि कारवाई करतील कधी हा प्रश्नही पुढे आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!