
नांदेड – बदलीपूर्वी कार्यरत असलेल्या कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील जिल्हा परिषद शाळेत एका जिल्हा परिषदेच्या शिक्षक दांपत्याने आयकर रिटर्न भरण्यासाठी पगाराचे विवरणपत्राची मागणी केली. त्यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिकेने विवरणपत्रासाठी प्रत्येकी ६०० रुपये मागितले. हे एकूण १२०० रुपये घेण्यासाठी मुख्याध्यापिकेच्या मदतीला दोन सहशिक्षकही सरसावले आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. हा प्रकार २९ जानेवारी रोजी घडला. याप्रकरणी उस्माननगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील जिल्हा परिषद शाळेत एक शिक्षक दांपत्य २०१९ ते सप्टेंबर २०२५ पर्यंत कार्यरत होते. माहे सप्टेंबर २०२५ मध्ये या शिक्षक दांपत्याची उस्माननगर जिल्हा परिषद शाळेतून बदली झाली. सध्या त्यांना आयकर रिटर्न भरण्यासाठी २०२५ चे पगाराचे विवरणपत्र द्यावे लागणार होते. यासाठी या शिक्षक दांपत्याने २६ जानेवारी २०२६ रोजी उस्माननगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या बळवंत वांगे, रा. छत्रपती शाहू महाराज पुतळ्यजवळ समतानगर रोड, पावडेवाडी नाका नांदेड यांना मोबाईलवरून त्यांचे आणि त्यांच्या पत्नीचे २०२५ चे पगाराचे स्टेटमेंट देण्याची विनंती केली. त्यावेळी मुख्याध्यापिका विद्या वांगे यांनी दोघांच्या पगाराचे विवरणपत्र देण्यासाठी प्रत्येकी ६०० रुपये असे एकूण १२०० रुपये द्यावे लागतील, असे म्हणून लाचेची मागणी केली. याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.
या तक्रारीनंतर २९ जानेवारी रोजी जिल्हा परिषद शाळा उस्माननगर येथे मुख्याध्यापिका विद्या वांगे यांची तक्रारदाराने भेट घेतली. त्यावेळी सहशिक्षक गौतम जयवंतराव सोनकांबळे रा. हडको, नवीन नांदेड हे तिथे हजर होते. तक्रारदार यांनी मुख्याध्यापिका विद्या वांगे यांना त्यांचे व त्यांच्या पत्नीचे २०२५ चे पगार विवरणपत्र देण्याची विनंती केली. त्यावेळी मुख्याध्यापिका विद्या वांगे यांनी सोनकांबळे यांच्याकडे पगाराचे विवरणपत्र आहेत ते घेऊन या, असे म्हणून तक्रारदारांना सहशिक्षक सोनकांबळे यांच्याकडे पाठवले. तक्रारदार हे सहशिक्षक सोनकांबळे यांच्याकडे गेले तेव्हा सोनकांबळे यांनी प्रत्येकी ६०० रुपये असे दोघांचे एकूण १२०० रुपये मुख्याध्यापिका वांगे यांना देऊन टाका असे म्हणून तक्रारदार यांना लाच देण्यास प्रोत्साहन दिले. त्यानंतर सहशिक्षक सोनकांबळे यांच्याकडून तक्रारदारांनी त्यांचे आणि त्यांच्या पत्नीचे पगाराचे विवरणपत्र घेऊन मुख्याध्यापिका वांगे यांच्याकडे गेले. त्यावेळी मुख्याध्यापिका वांगे यांनी सहशिक्षक रामेश्वर शामराव पांडागळे रा. शंकरनगरी गेट नंबर २, भगतसिंग चौक असर्जन यांना कार्यालयात येण्यास सांगितले. त्यानंतर मुख्याध्यापिका वांगे यांनी १२०० रुपये लाचेची मागणी करून फोन पे वर टाकण्यात सांगितले. तेव्हा तक्रारदारांनी फोन पे सध्या चालत नाही. नगदी घेऊन येतो असे म्हणून परत आले.
उस्माननगर जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापिका विद्या वांगे यांच्याकडे जात असताना सहशिक्षक सोनकांबळे यांनी तक्रारदार यांना फोन करून लवकर पैसे घेऊन या आम्ही वाट बघत थांबलो आहोत असे म्हणून तक्रारदारांना लाच देण्यास प्रोत्साहन दिले. तक्रारदार मुख्याध्यापिका विद्या वांगे यांच्याकडे जाऊन तुम्ही सांगितल्याप्रमाणे १२०० रुपये आणले आहेत, तुमच्या हाताने घेऊन पगाराचे विवरणपत्र देऊन टाका अशी विनंती केली. मुख्याध्यापिका वांगे यांनी १२०० रुपये सहशिक्षक पांडागळे यांच्याकडे द्या असे सांगितले. त्यावेळी सहशिक्षक सोनकांबळे हे पण कार्यालयात उपस्थित होते. तक्रारदारांनी सहशिक्षक पांडागळे यांच्याकडे लाचेची रक्कम दिली. तेव्हा पांडागळे यांनी १२०० रुपये आहेत का असे म्हणून स्वतःसाठी व मुख्याध्यापिका वांगे यांच्यासाठी १२०० रुपये लाच स्वीकारताना रंगेहात आढळून आले आहेत.
या सापळ्यात अडकल्यानंतर मुख्याध्यापिका विद्या वांगे यांच्या अंगझडतीत एक पॉकेट डायरी, चष्मा, हेडफोन, दोन मोबाईल आढळून आले आहेत तर रामेश्वर पांडागळे यांच्याकडे एक मोबाईल, आधार कार्ड, बँकेचे पासबुक आणि नगदी १२ हजार ६०० रुपये सापडले तर तिसरा आरोपी सहशिक्षक गौतम जयवंतराव सोनकांबळे यांच्या अंगझडतीत मोबाईल, घड्याळ आणि रोख १७५० रुपये सापडले. या प्रकरणी उस्माननगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक करीमखान पठाण हे करीत आहेत.



