
नांदेड – नांदेड जिल्हा पोलीस दलातील १९९ पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया ११ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे या पदांसाठी १४ हजार ६८२ अर्ज आले आहेत. ही भरती प्रक्रिया डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिली. भरती प्रक्रियेसाठी पोलीस अधीक्षकांसह दोन अपर पोलीस अधीक्षक, पाच उपविभागीय पोलीस अधिकारी, ६० पोलीस अधिकारी तसेच २५० पोलीस अंमलदार नियुक्त करण्यात आले आहेत.
नांदेड पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मैदानी आणि शारीरिक चाचणीला ११ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. या भरती प्रक्रियेचे वेळापत्रक टप्प्याटप्प्याने जाहीर केले जाणार आहे. उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळ आणि संदेशाद्वारे वेळोवेळी जिल्हा पोलीस दलाकडून माहिती दिली जाणार आहे. शारीरिक चाचणीत उमेदवारांची उंची आणि छाती मोजणी, १०० मीटर धावणे, १६०० मीटर धावणे ( महिला उमेदवारांसाठी ८०० मीटर) आणि गोळाफेक अशा घटकांचा समावेश आहे. शारीरिक चाचणीसाठी ५० गुण राहणार आहेत. शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी संपूर्ण शारीरिक चाचणी आधुनिक अशा आरएफआयडी तंत्रज्ञान, बायोमेट्रिक, ऑटो फोटो कॅप्चर तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि सीसीटीव्हीच्या निगराणीखाली घेण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांची उपस्थिती धावण्याची वेळ आणि चाचणीतील कामगिरी अचूक नोंदविता येणार आहे. या प्रणालीमुळे मानवी हस्तक्षेपाचा प्रश्नच उद्भवणार नाही. या भरती प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी १०० सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरे राहणार आहेत. गोपनीय शाखेचे साध्या वेशातील अंमलदारही विशेष पाळत ठेवणार आहेत. उमेदवारांनी कोणत्याही कर्मचारी अथवा मध्यस्थांच्या भूलथापांना आश्वासनाला बळी पडू नये, कोणी पैशांची मागणी केल्यास जवळील पोलीस ठाणे अथवा डायल 112 किंवा पोलीस अधीक्षकांकडे संपर्क साधण्याचा आवाहन नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.



