
नांदेड – नवीन नांदेडातील वाजेगाव येथील आकांक्षा मुंजाजी गायकवाड या २५ वर्षीय युवतीने हडको येथे मुलींच्या हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेता जीवन घोगरेस त्वरित अटक करावी, या मागणीसाठी शिवक्रांती बहुजन संघटनेच्या वतीने बुधवारी नांदेडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शिवक्रांती बहुजन संघटनेच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष वैशालीताई इंगोले यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात मृत आकांक्षाच्या कुटुंबीयांसह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.
वाजेगाव येथील आकांक्षा मुंजाजी गायकवाड वय २५ वर्ष ही युवती हडको येथील पद्मश्री शामराव कदम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज येथे बीएचएमएस येथे द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. ती हडको येथील जीवन घोगरेच्या निवासस्थानी असलेल्या हॉस्टेलमध्ये गेल्या वर्षभरापासून राहत होती. या हॉस्टेलचे शुल्क थकल्यामुळे जीवन घोगरेने तिचा मानसिक छळ केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. याच छळाला कंटाळून आकांक्षा गायकवाडने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ६ मार्च रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात जीवन घोगरेविरुद्ध ॲट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या दिवशी दुपारपर्यंत पोलिसांच्या समवेत असलेल्या जीवन घोगरेला मात्र आतापर्यंत पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. या गंभीर प्रकरणात राजकीय दबावातून घोगरेस अटक केली जात नसल्याचा आरोप शिवक्रांती बहुजन संघटनेच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष वैशालीताई इंगोले यांनी केला आहे. आकांक्षाच्या आईनेही यावेळी आपल्या मुलीचा घात केला असल्याचे सांगितले. यापुढे कोणत्याही मुलीचा अशा प्रकारे घात होऊ नये, यासाठी आकांक्षाला त्वरीत न्याय द्यावा अशी मागणी यावेळी केली.
लातूरमध्येही एका युवतीचा मृत्यू अशाच प्रकारे झाला होता. या दोन्ही प्रकरणात एसआयटी स्थापन करावी, महिला आयोगाकडून या घटनेची चौकशी करावी, सह आरोपींचीही चौकशी करावी हॉस्टेलमध्ये असलेल्या सुरक्षा व्यवस्था तसेच परवानगी आदी बाबींची चौकशी करावी, आकांक्षा गायकवाडच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत करावी यासह इतर मागण्याही यावेळी करण्यात आल्या. या प्रकरणात न्याय मिळाल्यास राज्यभर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रीय संविधान बचाव अभियान राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. देविदास इंगळे, राज्य संघटक मारोती चिवळीकर, सामाजिक नेते गणपत रेड्डी, भाकपा माले राज्य सेक्रेटरी दिगंबर घायाळे, मारोती घोरपडे, रावसाहेब डोईबळे, मुंजाजी मुळेकर यांच्यासह शेकडो महिलांची उपस्थिती होती. दरम्यान या प्रकरणातील आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी बहुजन समाज पार्टी तसेच इतर सामाजिक संघटनांनीही केली आहे.


