
नांदेड – नाशिकमधील कॅप्टन अशोक खरात या भोंदू बाबाचे प्रकरण राज्यात चर्चेत असतानाच नांदेडमध्येही भोंदू महाराजाने एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात महिलेने दिलेल्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोंदू संत हरीगीर दत्तगीर गिरी याला पोलिसांनी अटकही केली आहे. या प्रकरणात पोलिसांनीच एकदा समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याची बाबही पुढे आली आहे.
नांदेड शहरातील गाडीपुरा भागात असलेल्या महंत बाळगीर महाराज मठात पौर्णिमेच्या दर्शनासाठी गेलेल्या एका महिलेची तिथे संत हरीगीर दत्तगीर गिरी महाराज याच्यासोबत ओळख झाली. सदर महिला दर गुरुवारी मठामध्ये दर्शनासाठी जात होती. त्यावेळी भोंदूने महिलेशी सलगी वाढविली. तिचा मोबाईल क्रमांक घेतला आणि मोबाईलवर संभाषण सुरू केले. महिलेच्या वाढदिवसानिमित्त तिच्या घरी जाऊन तिच्याशी जबरदस्ती केली. यावेळी त्याने मी संन्यास सोडून तुझ्याशी लग्न करण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर भोंदू महाराजाने अत्याचार केला. पुढे लग्न करण्यास त्याने टाळाटाळ केली. त्यावेळी महिलेने लग्नासाठी वारंवार तगादा लावला. त्यामुळे महाराजाच्या नातेवाईकांनी तसेच मठातील लोकांनी सदर महिलेला धमक्या दिल्या. या महाराजाचे इतर अनेक मुली आणि महिलांबरोबर संबंध असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तीन ते चार वेळा अत्याचार केला. पुढे आपण संन्याशी असून लग्न करू शकत नाही, असे म्हणून भोंदू महाराजाने लग्नास नकार दिला. या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिसांनी भोंदू हरीगीर दत्तगीर गिरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनुसया केंद्रे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
भाग्यनगर पोलिसांनीच करून दिला होता समेट..! या प्रकरणातील पिडीत महिला १६ नोव्हेंबर २०२५ रोजी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली होती. त्यावेळी पोलिसांनी संत हरीगीर दत्तगीर गिरी याला पोलीस स्टेशनला आणले. त्यावेळी त्याने लग्न करतो असे बॉन्डवर लिहून दिले होते. त्यामुळे महिलेला लग्नाची हमी वाटली होती. महिलेकडून तक्रार देण्यात आली नाही. त्यानंतर ते महिलेच्या घरी गेले. त्यावेळी महाराजाने तिच्यावर घरामध्ये अत्याचार केला. पुढे काही दिवसाने नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक परिसरात मठाच्या लोकांनी महिलेला बोलावून मनाप्रमाणे पैसे घेऊन बॉंड लिहून देण्याची सक्ती केली. हे प्रकरण आपसात मिटवा असे म्हणून महिलेला पैशाचे आमिष दाखविण्यात आले. त्याचवेळी पैसे मागत आहे, अशी खोटी बदनामीही करण्याची धमकी दिली. महाराजांना गायब केले आणि ट्रस्टवाल्याची सुपारी घेतली असे खोटे आरोप लावून बघून घेण्याची धमकीही या महिलेला देण्यात आली होती, असे तक्रारीत म्हटले आहे.



