
नांदेड – प्रेम संबंधासह लग्न मोडल्याच्या कारणावरून नांदेडमध्ये सोनू कल्याणकरचा निर्घृण खून झाल्याचा प्रकार पुढे आला आहे. सोनू कल्याणकरच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणात धक्कादायक बाबी पुढे आल्या असून दहा-बारा दिवसापूर्वीच जंगमवाडी येथे सोनू कल्याणकरला अडवून आरोपींतानी तुझे दिवस भरले आहेत, नीट रहा अशा शब्दात धमकावण्यात आल्याचेही स्पष्ट झाले. दुसरीकडे या प्रकरणात पोलीस तक्रार देण्यास सोनू कल्याणकर धजावला नव्हता. कारण गोलू मंगनाळे हा रिंदाचा माणूस असल्याने तक्रार दिली तर ते मला नक्की मारून टाकतील, या भीतीमुळे त्याने तक्रार दिली नव्हती, असेही कल्याणकरच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणात रिंदा गँगचा सदस्य आणि सध्या तुरुंगात असलेल्या गोलू मंगनाळेसह त्याचे वडिल चंद्रविजय मंगनाळे आणि इतर चार जणाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी चार मारेकऱ्यांना तातडीने जेरबंदही केले आहे.
नांदेड येथे श्रीनगर येथील कुमार ड्रेसेसच्या विरुद्ध बाजूच्या रस्त्यावर सोमवारी सकाळी सव्वा पाच ते साडेपाच दरम्यान अनिकेत उर्फ सोनू कल्याणकर याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. हा खून आरोपींतानी मुलीची सोयरीक मोडल्याच्या कारणावरून आणि मयत सोनू कल्याणकरचे मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचा राग मनात धरून करण्यात आल्याचे भाग्यनगर ठाण्यात दिलेल्या तक्रारीत स्पष्ट केले आहे. चंद्रविजय मंगनाळे आणि मुक्तेश्वर उर्फ गोलू मंगनाळे या दोघांनी कट करून तसेच पाळत ठेवून आरोपी रोहित लोट, पियुष शिंदे, अंकुश गंदनवाड आणि मधु जोगदंड यांच्याकडून धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे केल्याची तक्रार भाग्यनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. सोनू कल्याणकरचे गेल्या दहा ते बारा वर्षांपूर्वी नाईनगर येथील चंद्रविजय मंगनाळेच्या मुलीसोबत प्रेम संबंध होते; परंतु वडील आणि भाऊ यांचा त्या प्रेमसंबंधास विरोध होता. त्यामुळे मुलीचे दुसरीकडे लग्न जुळवले होते; मात्र ते लग्न सोनू कल्याणकरने मोडल्याचा आरोप लावून त्याच्यावर २०२० मध्ये विमानतळ पोलिस ठाण्यात चंद्रविजय मंगनाळे यांनी तक्रार देत गुन्हा दाखल केला होता. त्याचवेळी सन २०२१ मध्ये गोलू मंगनाळे याने त्याच्या साथीधारासह सोनू कल्याणकरवर राहत्या घरी गोळीबार केला होता. त्यावेळी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. तेव्हापासूनच सोनू कल्याणकर याला मारण्यासाठी चंद्रविजय मंगनाळे आणि त्याचा मुलगा गोलू मंगनाळे हे कट रचत होते. सोनू कल्याणकर हा कोर्टामध्ये पेशीला जात होता. त्यावेळी चंद्रविजय रागाने बघून तुला बघून घेतो असे म्हणाल्याचे सोनू याने आपल्या पित्याला सांगितले होते. त्याचवेळी गोलू मंगनाळे हा जेलमध्ये असला तरी तो आणि त्याचे वडील हे आपल्यावर हल्ला करतील असे सांगितले होते. एकूणच नांदेडमध्ये अजूनही रिंदा गँगची दहशत असल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या तीन दिवसातील गुन्हेगारी टोळ्यांमध्ये सुरू असलेले हल्ले पाहता वेगवेगळ्या गँग पुन्हा एकदा सक्रिय होत असल्याचेच दिसत आहे.
दुसरीकडे दहा ते बारा दिवसांपूर्वी जंगमवाडी येथे सोनू कल्याणकरला थांबवून पियुष शिंदे, अंकुश गंदनवाड, मधु जोगदंड यांनी तुझे दिवस भरले आहेत नीट राहा, अशी धमकी सोनू कल्याणकरला दिली होती. त्यावेळी सोनूला पोलीस ठाण्यात तक्रार देऊ असे म्हटले असता त्याने सांगितले, ही सर्व मुले गोलू मंगनाळे यांचे मित्र आहेत, गोलू हा रिंदाचा माणूस आहे. त्यामुळे आपण तक्रार दिली तर ते मला नक्की ठार मारून टाकतील, त्यामुळे तक्रार द्यायची नाही असे तो म्हणाला होता. त्यामुळे पोलिसाकडे तक्रार केली नसल्याचेही सोनू कल्याणकरचे वडील अशोक माधवराव कल्याणकर यांनी आपल्या भाग्यनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. भाग्यनगर पोलिसांनी अशोक कल्याणकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून चंद्रविजय मंगनाळे, मुक्तेश्वर उर्फ गोलू मंगनाळे, रोहित लोट, पियुष शिंदे अंकुश गंदनवाड आणि मधु जोगदंड या सहा जणाविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत त्यातील चौघांना आज पोलिसांनी तातडीने अटकही केली आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केंद्रे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.



