प्रशासकीय

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्याला ८१३ कोटी ९३ लाख रुपये मंजूर

खरीप हंगाम सन २०२५ मधील पिक नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात

नांदेड  : नांदेड जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन २०२५ अंतर्गत ४ लाख ३४ हजार ८१९ शेतकऱ्यांना ८१३ कोटी ९३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. पिक विमा कंपनी मार्फत प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या पोर्टलवरून पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात वितरणास दि.२१ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन २०२५ अंतर्गत ४ लाख ३४ हजार ८१९ शेतकऱ्यांनी ८ लाख २९ हजार ७३७ विमा अर्ज दाखल केले आहेत. त्याद्वारे ५ लाख १३ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविला होता. माहे ऑगस्ट ते सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे ७ लाख २७ हजार ९३२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. सदर नुकसानग्रस्त पिक विमाधारक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाईपोटी ८१३ कोटी ९३ लाख रक्कम मंजूर झाली आहे .पिक विमा कंपनी मार्फत प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या पोर्टल वरून पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात वितरणास  सुरुवात झाली आहे.

पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामाकरिता पीक पेरणीपासून काढणीपर्यतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पिक उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या इतर बाबींमुळे हंगामाच्या शेवटी, पीक कापणी प्रयोग आधारे, तांत्रिक उत्पादन आधारे, सदर महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरून नुकसान भरपाई देय असून जिल्ह्यात माहे ऑगस्ट ते सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे ७ लाख २७ हजार ९३२ हे. क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये सोयबीन, मुग, उडीद, पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत सोयबीन, मुग, उडीद, कापूस, तूर आणि ज्वारी पिके अधिसूचित असून खरीप हंगाम सन २०२५ पासून सुधारित उंबरठा उत्पन्नावर आधारित पिक विमा राबविण्यात येत आहे. सदर पिकांचे जिल्ह्यात ३ हजार ३१२ पिक कापणी प्रयोग नियोजित होते. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पिक नुकसान झाल्यामुळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी पिक कापणी प्रयोगाचे सूक्ष्मनियोजन करून महसूल विभाग, ग्रामविकास विभाग व कृषी विभाग यांचे क्षेत्रीय अधिकारी यांच्या वेळोवेळी बैठक आयोजित करून सर्व पिक कापणी प्रयोग CCE मोबाईल app वर होतील व वस्तुनिष्ठ होतील याची खबरदारी घेतली. पिक कापणी प्रयोगाचे काम सुरु असताना पिक विमा कंपनीकडून वेळोवेळी आक्षेप घेण्यात आले होते. सदर आक्षेपाचे निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांचे अध्यक्षतेखालील सुकाणू समितीने निराकरण केले. त्यामुळे नांदेड जिल्ह्याला सुधारित पिक विमा योजनेनुसार उंबरठा उत्पन्नावर आधारित नुकसान भरपाई या एका घटका अंतगर्त ८१३ कोटी ९३ लाख रक्कम सोयाबीन, मुग व उडीद पिकासाठी मंजूर झाला आहे.

पिक विमा योजनेअंतर्गत मंजूर नुकसान भरपाई प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या पोर्टल वरून ऑनलाईन डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असून सद्यस्थितीत मंजूर ८१३ कोटी ९३ लाख रुपये रकमेचे वितरण सुरु आहे.  सर्व विमाधारक शेतकऱ्यांना योजनेच्या पोर्टलवर शेतकरी लॉगिन मध्ये आधार नंबर टाकून ओटीपी प्रविष्ट केल्यावर आपली मंजूर रक्कम पाहता येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!