
नांदेड – नांदेड महापालिका आणि वाहतूक शाखेच्या वतीने सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला नांदेडमध्ये सोमवारी गालबोट लागले. संतप्त जमावाने पोलिसांसमक्षच शासकीय कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. जेसीबी चालकाला पाच ते सहा जण जबर मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणात आता महापालिकेच्या वतीने दिलेल्या तक्रारीवरून वजीराबाद ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. तीन ते चार जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतले असल्याची माहिती पुढे आली आहे. अपुऱ्या पोलीस बंदोबस्तामुळे ही घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे. एकूणच नांदेड महापालिका आणि पोलीस दलाच्या संयुक्त मोहिमेला गालबोट लागले आहे. महापालिकेने स्थानिक पोलिसांना कोणतीही माहिती न देताच कारवाई सुरू केल्याने हा अनुचित प्रकार घडला असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
नांदेड पोलीस दल आणि महापालिकेच्या वतीने गेल्या काही दिवसांपसून शहरातील प्रमुख रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यात येत आहे. या अतिक्रमण मोहिमेदरम्यान गरिबांना त्रास दिला जात असल्याचा आरोपही केला जात आहे. वेगवेगळ्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी शहरातील कलामंदिर, मिल गेट परिसरातील अतिक्रमण काढून हे पथक दुपारी बारा वाजेनंतर एनटीसी मिलच्या मागे असलेल्या वाघी रस्त्याकडे वळले. महापालिकेच्या उत्तर आणि दक्षिण विभागाच्या अतिक्रमण पथक प्रमुखांकडून या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. अतिक्रमण काढण्यास प्रारंभ होताच मोठ्या संख्येने तेथे जमाव जमला.
जमावाने या अतिक्रमण मोहिमेला विरोध केला. जमावाचा विरोध धुडकावून मोहीम राबवली जात होती. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावातील पाच ते सहा जण थेट जेसीबीवर चढले आणि जेसीबी चालकाला त्यांनी जबर मारहाण केली. यावेळी उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मारहाण करणाऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न करत होते; मात्र पोलीस अधिकाऱ्यांनाही ते युवक जुमानत नव्हते. अखेर पोलिसांनी कसेबसे त्या जेसीबी चालकाला जमावाच्या तावडीतून सोडविले. यावेळी जमावातील काही जणांनी महापालिका अतिक्रमण पथकावर दगडफेक केल्याचाही प्रकार स्पष्ट झाला आहे. या घटनेने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांची सुरक्षा ऐरणीवर आली असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. महापालिकेच्या वतीने या प्रकरणात वजीराबाद पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. त्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
‘कास्ट्राईब’ ने दिला काम बंद आंदोलनाचा इशारा…नांदेड महापालिकेच्या अतिक्रमण मोहिमेत जेसीबी चालक मालू कांबळे यांना जमावाने लाथा बुक्क्यांनी अमानुष मारहाण केली त्यामध्ये कांबळे हे बेशुद्ध झाले. या जमावाने शासकीय कामात अडथळा निर्माण करून शासकीय कर्मचाऱ्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे संबंधावर गुन्हे दाखल करण्याची मागणी का स्टाईल केली आहे या मारहाणीचा निषेध म्हणून महापालिकेच्या प्रांगणामध्ये महापालिका कर्मचारी एकत्रित येऊन काम बंद आंदोलन करणार असल्याची माहिती कास्ट्राईबचे महानगराध्यक्ष साहेबराव ढगे यांनी दिले.
महापालिका अधिकाऱ्यांना मारहाणीची तिसरी घटना..!दुसरीकडे खडकपुरा भागात महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला होण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी मनपा बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता विश्वनाथ स्वामी त्यानंतर वजीराबादचे सहाय्यक आयुक्त गौतम कवडे यांनाही अशाच मोहिमेदरम्यान मारहाण झाली होती. आज सोमवारीही महापालिकेचे अतिक्रमण पथक हे अपुऱ्या पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहिमेला पोहोचले होते. वजिराबाद पोलिसांना या मोहिमेची कोणतीही माहिती देण्यात आली नाही. कलामंदिर, मिलगेट परिसरातील अतिक्रमण सुरळीत हटवल्यानंतर पुढेही ही मोहीम सुरळीत राबविली जाईल, असा असा विश्वास अतिक्रमण प्रमुखांना वाटला आणि त्यातूनच पुढचा अनर्थ घडला. जेसीबी चालकाला बेदम मारहाण करण्यात आली. या जेसीबी चालकाला प्रारंभी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आता या कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात असले तरीही या घटनेने एकच खळबळ उडाली आहे



