
नांदेड – अमरावती विभागाच्या राज्य सेवा हक्क आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेले अरुण किशोर डोंगरे यांना राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव यांनी मंगळवारी डोंगरे यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. नांदेडचे जिल्हाधिकारी या पदावर काम करताना डोंगरे यांनी जलयुक्त शिवार ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबवली. या योजनेचा राज्यस्तरावर गौरव करण्यात आला.
मुंबई येथील नवीन प्रशासन भवन येथील महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या कार्यालयात शपथग्रहण सोहळा पार पडला. माजी आयुक्त दिलीप शिंदे यांनी नियुक्तीची अधिसूचना वाचून दाखविली. यावेळी विधानसभा सदस्य करण देवतळे, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे, कोकण विभागाचे राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंह, पुणे विभागाचे राज्य सेवा हक्क आयुक्त सुधाकर तेलंग तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुंबई येथील म्हाडाच्या बिल्डिंग रिपेअर अँड री कन्स्ट्रक्शन बोर्डाचे मुख्य अधिकारी म्हणून अरुण डोंगरे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर शासनाने त्यांची सेवाहक्क आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे.
शासकीय सेवेत सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा या सामाजिक बांधीलकीने त्यांनी काम केले असून, शासकीय सेवेची सुरुवात उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मंगरूळपीर येथून झाली आहे. अमरावती विभागात मूर्तिजापूर, दारव्हा, अचलपूर येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम केल्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी अमरावती तसेच महसूल उपायुक्त अमरावती व नागपूर या पदावरही काम केले आहे. अमरावती महापालिका आयुक्त म्हणून शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच ऑनलाइन इमारत परवाना पद्धत लागू केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला घर बांधणीसाठी सुलभपणे परवानगी मिळत आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना स्वच्छ भारत अभियानात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अभिनेते अभिताभ बच्चन यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला होता. यशवंत पंचायतराज अभियानातही त्यांना राज्यात द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
नांदेड जिल्हाधिकारी म्हणूनही पाहिले आहे डोंगरे यांनी काम…नांदेडचे जिल्हाधिकारी या पदावर काम करताना अरुण डोंगरे यांनी जलयुक्त शिवार ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबवली. या योजनेचा राज्यस्तरावर गौरव करण्यात आला. शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे मुख्य कार्याधिकारी तसेच शासनाच्या विविध विभागात त्यांनी यशस्वीपणे सेवा दिली आहे. मुंबई येथील म्हाडामध्ये मुख्याधिकारी असताना इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना त्यांचा हक्क अबाधित राहावा, त्यांना वेळेत भाडे मिळावे व इमारतीचे नियोजित वेळेत बांधकाम करून पुनर्वसन करण्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण शासन निर्णय त्यांच्या कार्यकाळात निर्गमित करण्यात आला. त्यांच्या प्रभावी व उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन शासनाने त्यांची अमरावतीचे राज्य सेवाहक्क आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे.



