
नांदेड : नांदेड जिल्ह्यातून दरवर्षी ६०० हून अधिक यात्रेकरू पवित्र हज यात्रेसाठी रवाना होतात. हज यात्रेपूर्वी यात्रेकरूंची वैद्यकीय तपासणी, मेडिकल स्क्रीनिंग टेस्ट, पोलिओ लसीकरण आणि इतर आवश्यक लसीकरण करणे गरजेचे असते. हज २०२७ च्या यात्रेकरूंसाठी वैद्यकीय तपासणी, पोलिओ लसीकरण आणि इतर आवश्यक वैद्यकीय सुविधा नांदेडमध्ये देगलूर नाका येथील हैदरबाग येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी खादिम-ए-हुज्जाज ट्रस्टतर्फे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्याकडे करण्यात आली आहे. या संदर्भात ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी खा. चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
नांदेडमध्ये यापूर्वी हज यात्रेकरूंसाठी वैद्यकीय तपासणी शिबिर हैदरबाग येथील मनपा रुग्णालयात आयोजित केले जात होते. या ठिकाणी यात्रेकरूंसाठी योग्य नियोजन आणि आवश्यक सुविधा उपलब्ध होत्या. मात्र मागील वर्षी वैद्यकीय तपासणी शिबिर श्री गुरु गोबिंदसिंहजी शासकीय रुग्णालयात आयोजित करण्यात आले होते. मोठ्या संख्येने यात्रेकरू उपस्थित असल्याने तसेच योग्य नियोजन आणि मार्गदर्शनाचा अभाव असल्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, असे ट्रस्टने निवेदनात म्हटले आहे. तसेच मागील वर्षी खादिम-ए-हुज्जाज ट्रस्टसह इतर स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांना शासकीय रुग्णालयात यात्रेकरूंच्या मदतीसाठी सेवा देण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे यात्रेकरूंना आणखी अडचणींचा सामना करावा लागल्याचे ट्रस्टने सांगितले. खादिम-ए-हुज्जाज ट्रस्ट गेल्या सुमारे १५ वर्षांपासून नांदेड जिल्ह्यातील हज यात्रेकरूंची मोफत सेवा करत आहे. ट्रस्टच्या माध्यमातून हजचे अर्ज भरणे, यात्रेकरूंची निवड झाल्यानंतर हज प्रशिक्षण शिबिर आयोजित करणे, वैद्यकीय तपासणीसाठी सहकार्य करणे, पोलिओ लसीकरण व आवश्यक लसीकरणाबाबत मदत करणे तसेच हज यात्रेपूर्वी आवश्यक माहिती व मार्गदर्शन केले जाते. हैदरबाग येथील मनपा रुग्णालयात पुरेशी जागा, आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि योग्य नियोजनाची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे हज २०२७ च्या यात्रेकरूंसाठी मेडिकल स्क्रीनिंग टेस्ट, पोलिओ लसीकरण आणि आवश्यक लसीकरणाची व्यवस्था याच रुग्णालयात करण्यात यावी. तसेच खादिम-ए-हुज्जाज ट्रस्टसह इतर स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांना यात्रेकरूंच्या मदतीसाठी सेवा देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी खा. अशोकराव चव्हाण यांनी हज यात्रेकरूंच्या सुविधेसाठी शक्य ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून या प्रकरणी आवश्यक कार्यवाही करण्याचे सांगितले. यावेळी खादिम-ए-हुज्जाज ट्रस्टचे पदाधिकारी शेख नवीद इकबाल, ॲड. नदीम खान, अल्हाज जहीर सर, इकबाल सर आणि हैदर अली उपस्थित होते.



