
नांदेड – भरधाव वेगातील एका ट्रकने मॅजिक ऑटोला धडक दिल्याने ऑटोतील ८ जण ठार झाल्याची घटना नांदेड – भोकर रस्त्यावरील सीताखंडी घाटात गुरुवारी सायंकाळी घडली. या अपघातात आणखी ५ ते ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना भोकर आणि नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
नांदेडहून प्रवासी घेऊन भोकरकडे जात असलेल्या टाटा मॅजिक या वाहनास सीताखंडी घाटानजीक वाकद गावाजवळ भोकरकडून येणाऱ्या एपी २९ टीए ८१२९ क्रमांकाच्या ट्रकने जबर धडक दिली. या धडकेने टाटा मॅजिक अक्षरशः रस्त्याच्या बाजुला फेकला गेला. अपघातात ६ जण जागीच ठार झाले तर दोघांचा मृत्यू रुग्णालयात नेत असताना झाला. ऑटोतील अन्य पाच ते सहा प्रवासीही गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी भोकर आणि नांदेड येथे शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या अपघातात ट्रक चालकही गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच भोकर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश भंडरवार यांनीही घटनास्थळी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली जखमींना उपचारासाठी तातडीने हलविले.
या अपघातात नांदेड येथे विष्णूपुरी शासकीय रुग्णालयात आणलेल्या कृष्णा विनायक पवार वय ३२ वर्ष रा. पोटा तांडा ता. भोकर, अनोळखी पुरुष वय अंदाजे ४२ वर्ष यांचा मृत्यू झाला आहे. शेख रेहान शेख शादुल वय १५ वर्षे रा. भोकर, रेखा बर्गे वय ३५ वर्ष रा. नारवाट ता.भोकर, शेख जलील वय ६० वर्ष, पिंटू गोविंदराव डवरे वय ४० वर्ष आणि अन्य एका अनोळखी व्यक्तीवर उपचार केले जात आहेत.
दरम्यान, या अपघाताबद्दल माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे आणि भोकरच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यावेळी जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाला दिले आहेत. अपघातातील जखमींच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून उपचारात कोणतीही हयगय होऊ नये, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला केल्या आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच खा. अशोकराव चव्हाण तत्काळ भोकरकडे रवाना झाले आहेत. राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांनीही नांदेड-भोकर मार्गावर झालेल्या भीषण अपघात झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायी असल्याचे म्हटले आहे. स्थानिक प्रशासनाने सर्व जखमींवर तातडीने व योग्य ते वैद्यकीय उपचार पुरवावेत अशा सूचनाही दिल्या आहेत.



