क्राईम

नांदेड जिल्ह्यात वाळू माफियांचा धुमाकूळ, पोलिसांच्या वेगवेगळ्या कारवाईत अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त 

लिंबगाव ठाणे हद्दीत विशेष पोलीस उप महानिरीक्षकांच्या विशेष पथकाची सलग दुसरी कारवाई, नांदेड ग्रामीण पोलिसांकडून वाळू माफियांवरील कारवाईत सातत्य कायम

नांदेड – जिल्ह्यात वाळू माफियांचा धुमाकूळ सुरू आहे. जिल्ह्यात असलेल्या नद्या माफियांकडून अक्षरशः ओरबडल्या जात असतानाही या सर्व प्रकारावर महसूल विभागाने अर्थपूर्ण मौन बाळगले असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे पोलीस दलाच्या वेगवेगळ्या कारवाया सुरू आहेत. पोलीस उपमहानिरीक्षकांकडून स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकाने नांदेड जिल्ह्यात दररोज कुठे ना कुठे अवैध धंद्यावर कारवाई सुरूच ठेवली आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनीही वाळू माफियाविरुद्ध विशेष मोहीमच उघडली असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने केलेल्या कारवाईत १ कोटी ३६ लाख १० हजार रुपयांचा तर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कारवाईत १ कोटी १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातून वाळू माफियांचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाकडून नांदेड तालुक्यातील लिंबगाव पोलीस ठाणे हद्दीत बोरगाव येथे गोदावरी नदी घाटावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे सहकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईत दोन हायवा, एक टिप्पर, जेसीबी मशीन, इंजिन बोट, फायबर बोट, १० तराफे आणि ५० ब्रास वाळू असा एकूण १ कोटी ३६ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अर्जुन विलासराव क्षीरसागर रा. बोरगाव ता. नांदेड, राजेश चंदर गायकवाड रा. बेलापूर ता. धर्माबाद, पूजा नितीन गिरडे रा. असदवन नांदेड, विकास संजय मोरे रा. सुनीलनगर सिडको, अविनाश नामदेव राठोड रा. जानापुरी, शेख रमजान ईद शेख नबी रा. खडकपुरा, शेख वशिम शेख इसाक रा. खडकपुरा, शमशाद अन्सारी रफदीन अन्सार रा. सोनखेड या नऊ जणांवरुद्ध लिंबगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपी लक्षात घेता संपूर्ण जिल्ह्यातील वाळूमाफिया एकत्रित येत येथे लिंबगाव ठाणे हद्दीत अवैध वाळू उपसा सुरू केला असल्याचे स्पष्ट होत आहे. लिंबगाव पोलीस ठाणे प्रभारींवर वाळू माफियांशी असलेल्या सलगीच्या कारणावरून काही दिवसांपूर्वी प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र पुन्हा त्यांना लिंबगाव ठाणे बहाल केले. त्यात आता पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाळू माफीयांनी आपला अवैध वाळू उपसा करण्याचा वेग निश्चितपणे वाढविला असल्याचे स्पष्ट होत आहे.

दुसरीकडे नांदेड ग्रामीण पोलिसांनी वाळू माफियाविरुद्ध आपल्या कारवाईतील सातत्य कायम ठेवले आहे. १७ मे रोजी पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड, पोकॉ असिफ अली, पोकॉ विष्णू कल्याणकर, पोकॉ संतोष पवार, गवेंद्र सिरमलवार यांनी केलेल्या कारवाईत इंजेगाव आणि बोंढार शिवारातील नदीपात्रात होत असलेला अवैध वाळू उपसा रोखताना तब्बल १ कोटी २५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. ग्रामीण पोलिसांनी एक बोट, एक वाहन, क्रेन, २० तराफे, सहा इंजिन आणि पाच ब्रास रेती जप्त केली आहे. याप्रकरणी माधव मोतीराम जाधव रा. हिंदोळा ता. लोहा, इंद्रजीत सिंग केसर सिंग सोखी रा. नंदीग्राम सोसायटी, शेख अजीम शेख सलीम रा. खुदबईनगर आणि पिंटू पाटील तिडके रा. बोंढार तसेच इतर चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नांदेड ग्रामीण पोलिसांचे कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!