
नांदेड – नांदेडसह संपूर्ण राज्यभरात बंद पडलेल्या आकाशवाणीच्या सायंकालीन प्रसारण सभा पुन्हा एकदा सुरू करण्याच्या महत्त्वपूर्ण प्रश्नाकडे नांदेडचे राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी आता केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन यांचे लक्ष वेधले आहे. नांदेड आकाशवाणी केंद्रातील मनुष्यबळाची कमतरता दूर करून स्थानिक कलाकारांना वाव देणारे सायंकाळचे कार्यक्रम पूर्ववत सुरू करण्याची मागणीही डॉ. गोपछडे यांनी यावेळी केली.
नवी दिल्ली येथे मंगळवारी खासदार डॉ. गोपछडे यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन यांची भेट घेतली. या भेटीत गेल्या तीन चार वर्षांपासून महाराष्ट्रातील आकाशवाणी केंद्रावरून सायंकालीन प्रसारण सभा बंद पडल्याचा विषय मांडला. राज्यातील निवडक आकाशवाणी केंद्रावर आजघडीला सायंकाळचे प्रसारण सुरू आहे. बहुतांश आकाशवाणी केंद्राचे सायंकालीन प्रसारण सभा बंद करण्यात आल्या आहेत. याचा मोठा फटका आकाशवाणी श्रोत्यांना बसला आहे. ग्रामीण भागात आजही मोठ्या संख्येने आकाशवाणीवरील कार्यक्रम ऐकले जातात; मात्र आकाशवाणी केंद्राच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे संपूर्ण राज्यात सायंकालीन प्रसारण सभा पूर्णतः बंद पडल्या आहेत. या वेळेमध्ये विविध भारती सेवेचे कार्यक्रम अथवा आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचे प्रसारण सहक्षेपणाद्वारे केले जाते. या संपूर्ण प्रक्रियेत स्थानिक लोक कलावंतांची मोठी गोची झाली आहे. लोकसंगीत, कीर्तन, लहान मुलांचे कार्यक्रम, युवकांसाठीच्या विविध कार्यक्रम यासह स्थानिक कलावंतांना सादर करता येणारे कोणतेच कार्यक्रम सुरू नाहीत केवळ आकाशवाणीवरून गीत संगीत असेच कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सादर होत आहेत. त्यामुळे आकाशवाणीचा माहिती, मनोरंजन आणि शिक्षण हा मूळ उद्देश बाजूलाच पडला असल्याचे दिसत आहे.
खा. डॉ. अजित गोपछडे यांनी या भेटीत नांदेड आकाशवाणीच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली व निवेदन सादर केले. नांदेड आकाशवाणी केंद्रातील मनुष्यबळाची कमतरता दूर करून स्थानिक कलाकारांना वाव देणारे सायंकाळी प्रसारित होणारे स्थानिक कार्यक्रम पूर्ववत सुरू करण्याची मागणी यावेळी केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, संपूर्ण नांदेड जिल्ह्याला दर्जेदार रेडिओ नेटवर्कचा लाभ मिळवून देण्यासाठी, नांदेड येथील एफएम रेडिओ केंद्राची क्षमता वाढवण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव स्वीकारत, नांदेड एफएम केंद्राची क्षमता वाढवून त्याद्वारे देगलूरसह संपूर्ण जिल्हा कव्हर केला जाईल, असा सकारात्मक शब्द आणि आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन दिले आहे. या निर्णयामुळे संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागातील श्रोत्यांना आणि स्थानिक कलाकारांना मोठा फायदा असा विश्वास डॉ. गोपछडे यांनी व्यक्त केला आहे.



