
नांदेड – नांदेडमध्ये आज बुधवारी यावर्षीच्या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे बुधवारी ४४.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली तर किमान तापमान हे २९.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ४० टक्के इतके नोंदवले आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरवासीयांना महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी नागरिकांनी उन्हापासून बचावाची दक्षता घ्यावी त्याचवेळी उष्माघातापासून स्वतःचे रक्षण करावे असे आवाहन केले आहे.
जिल्ह्यात मार्चपासूनच तापमानाचा पारा चढताच राहिला आहे. वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे काही दिवस तापमानाचा पारा किंचित प्रमाणात घसरला होता. तापमान ३८ अंश सेल्सिअस ते ४०, ४१, ४२.८ अंश सेल्सिअसवरून २८ एप्रिल रोजी तापमान ४३.७ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. पुढे मेच्या मध्यापर्यंत तापमान कमी अधिक होत राहिले. आज २० मे रोजी जिल्ह्यात तापमानाचा पारा कमाल अंशापर्यंत पोहोचला. यावर्षीच्या सर्वाधिक ४४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद जिल्ह्यात झाली आहे. किमान तापमान २९.४ अंश सेल्सिअस इतके आहे. जिल्ह्यात लग्नाचे मुहूर्त संपले असले तरी हे काही ठिकाणी अद्यापही लग्न तसेच इतर काही समारंभ होत आहेत. नागरिक उन्हाचा फटका बसू नये यासाठी दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळत असल्याचे दिसत आहेत.
जिल्ह्यात यावर्षी एप्रिल महिन्यापासून अनेक वेळा उष्माघाताच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे या इशारा नतर तरी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने प्रत्यक्ष उपायोजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे होते. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात या उपायोजना झाल्याच नाहीत. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सध्या प्रभारी राजवर सुरू आहे त्यामुळे कदाचित उपाय योजनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नसेल असेच म्हणावे लागेल. तापमानाचा हा चढता पारा लक्षात घेता जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे स्वतंत्र उष्माघात कक्ष स्थापन करून उष्माघात झालेल्या रुग्णांना उपचार देण्यात यावे असे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात जिल्ह्यात उष्माघाताचा फटका बसलेल्या रुग्णांना उपचार देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली नाही. केवळ उन्हापासून बचावाच्या सूचना जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहेत. प्रत्यक्षात उन्हाळयामध्ये उष्माघाताने रुग्णांवर उपाययोजना करण्यासाठी व मृत्यू टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणांकडून आरोग्य संस्थांमध्ये उष्माघात उपचार कक्ष स्थापन करणे गरजेचे आहे. तशी कोणतीही व्यवस्था झाली नाही. जिल्हा परिषद यावर सध्या प्रशासकीय राज आहे. या प्रशासकीय काळात नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसह आरोग्याकडेही दुर्लक्ष होत असल्याचेच दिसत आहे.
