
नांदेड – नांदेड ग्रामीण पोलिसांपाठोपाठ आता स्थानिक गुन्हा शाखेनेही नांदेडमधील अवैध शस्त्रसाठ्यावर धाड टाकून कारवाई केली आहे. तब्बल १४ लाख ४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करताना ७०३ अवैध शस्त्र जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये ४७० तलवारी, २०९ खंजीर, २४ फायटर असे अवैध शस्त्र आढळले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे.
जिल्ह्यात ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत अवैध शस्त्र, मटका, जुगार यासह रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे आणि त्यांच्या पथकातील सहकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार २२ मे रोजी नांदेड शहरातील देना बँक परिसरात ३०० सालाना शॉपिंग प्लाझामधील दुकान क्रमांक ८ मध्ये रणजीतसिंग रामसिंग सरदार हा त्याच्या दुकानांमध्ये विनापरवाना बेकायदेशीररित्या तलवारी, खंजीर, दोन्ही बाजूने धारदार आणि घातक शस्त्र विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीनंतर माहूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांना सोबत घेऊन छापा मारला असता दुकान मालक रणजीतसिंग रामसिंग सरदार हा पोलिसांना पाहताच पळून गेला. त्याच्या दुकानाची झडती घेतली असता दुकानांमध्ये ४७० तलवारी, २०९ खंजीर, चाकू, २४ फायटर, पंच असे एकूण ७०३ अवैध शस्त्र ज्याची एकूण किंमत १४ लाख ४ हजार ३०० रुपये इतकी आहे. या प्रकरणात वजीराबाद ठाण्यात दुकान मालक रणजीतसिंग रामसिंग सरदार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात पोलीस विभागाच्या वतीने ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत सुरू केलेल्या या कारवाईमुळे अवैध शस्त्र विक्री करणाऱ्या आणि बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली किरण भोंडवे, पोलीस निरीक्षक अतुल भोसले, उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे, पोहेकॉ रविशंकर बामणे, उमर शेख मिलिंद नरबाग, ज्ञानेश्वर कवठेकर, पोकॉ चंद्रकांत स्वामी अझरुद्दीन शेख, अनिल बिरादार, राजवंतसिंग बुंगई, धमानंद जाधव, महिला पोहेकॉ शितल सोळंके आणि मारुती मुंडे यांनी केली.



