
नांदेड – नांदेड शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातून चक्क एक बसचोरी करण्याचा प्रयत्न शनिवारी पहाटे साडेपाच वाजेदरम्यान झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीस वजीराबाद पोलिसांनी अटक केली आहे. याच व्यक्तीने यापूर्वी आंध्रप्रदेशात एक बस चोरीचा प्रयत्न केला असल्याची बाबही समोर आली आहे.
नांदेड बसस्थानकातून शनिवारी पहाटे एक अनोळखी व्यक्ती एसटी डेपोतून एमएच १४ एमएच १३८० क्रमांकाची एसटी बस डेपोतून चोरून घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असल्याची बाब निदर्शनात आली. नांदेड मध्यवर्ती बसस्थानकातील वाहन परीक्षक श्रीनिवास लेचट्टीवार यांनी यांच्यासह सहाय्यक वाहतूक निरीक्षक कोंडीबा गोविंदराव केंद्रे, प्रभारक संदीप गंगाधर बोधनकर, योगेश गुलाबराव जगताप, सेक्युरिटी गार्ड राहुल अशोकराव सिडाम यांना सांगितले. त्यावेळी ते सर्वजण तिथे आले. त्यावेळी बस चोरीचा प्रयत्न करणाऱ्या विष्णू गणपती निलावार वय २३ वर्षे रा. उमरखानगुडा अमरपेठ ता. संगीनगर जि रंगारेड्डी आंध्र प्रदेश याला अडविले. या प्रकरणात वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३० लाख रुपयांची बस डेपोतून चोरण्याचा प्रयत्न करून इतरांच्या जीवितास किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणारी आणणारे कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या प्रकरणातील आरोपी असलेल्या विष्णू निलावार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती वजीराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी दिली आहे. याच आरोपीने यापूर्वीही आंध्र प्रदेशात बस चोरीचाच प्रयत्न केला होता. तो मूळचा कंधार तालुक्यातील रहिवासी आहे तो विक्षिप्त स्वभावाचा असल्याचेही स्पष्ट झाले आहे. आरोपीच्या आईचा पित्यानेच खून केला असल्याची बाबही पुढे आली आहे. एकूणच कौटुंबिक परिस्थितीतून सदर युवक विक्षिप्त स्वरूपातून अशा प्रकारच्या घटना करीत असल्याचेही सांगण्यात आले.



