
नांदेड – नांदेड शहरात तरोडा भागातील शिवरोड येथे कोल्हापुरी तडका ढाबा येथे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. मालेगाव रोड ते खंडोबा चौकाकडे जाणाऱ्या शिवरस्त्यावर विराट ढाबा उर्फ कोल्हापुरी तडका ढाबा येथे छुप्या मार्गाने हा वेश्याव्यवसाय चालविला जात होता. या प्रकरणात चार महिलांची सुटका करण्यात आली. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कारवाईदरम्यान दोघांना अटक केली असली तरी मुख्य मालक आणि चालक मात्र फरार झाला आहे.
शिवरोडवरील कोल्हापुरी तडका ढाबा येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. धाबा मालक प्रकाश अवस्ती हा बाहेर राज्यातील महिलांना आणून त्यांच्याकडून बळजबुरीने अनैतिक व्यवसाय करून घेत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी माणिक बेद्रे यांना मिळाली. या माहितीनंतर एक विशेष पथक तयार करण्यात आले. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी एका सामाजिक कार्यकर्त्याला बोगस गिऱ्हाईक म्हणून ढाब्यावर पाठवले. तेथे जाऊन वेश्यागमनासाठी इसम निश्चित करताच पोलिसांना ठरल्याप्रमाणे त्याने इशारा केला. इशारा मिळतात पोलीस पथकाने या ढाब्यावर छापा टाकला त्यावेळी रुपेश सुभाष पात्रे वय २६, रा. गजानन मंदिर नांदेड तसेच लहू राजू घुगे वय २५ रा. नेरली या वेटरला अटक करण्यात आली.
याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी गायकवाड यांच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी माणिक बेद्रे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, उपनिरीक्षक महेश कोरे पोलीस अंमलदार रितेश कुलथे, मिलिंद नरबाग, ज्ञानोबा कवठेकर, दासरे, गायकवाड, देवकते तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी गायकवाड, मोरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल केंद्रे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
या प्रकरणातील मुख्य मालक आणि चालक प्रकाश अवस्ती हा फरार झाला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी या कुंटणखाण्यातून एकूण चार पिडीत महिलांची सुटका केली आहे. यामध्ये नांदेड आणि आसाम येथील महिलांचा समावेश आहे. आरोपी हे या महिलांना पैशांचे आमिष देऊन बळजबरीनेचे वेश्या व्यवसाय करून घेत होते. घटनास्थळावरून पोलिसांनी वेश्यागमनासाठी वापरण्यात येणारे साहित्य, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण ३२ हजार ३२९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.



