
नांदेड – जिल्ह्यातील उमरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार आणि चालक हे दोघे उमरी ते धर्माबाद रस्त्यावर कर्तव्य बजावत असताना २३ जून रोजी थेट वसुली करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने जिल्हा पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत त्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी मंगळवारी दिले आहेत.
उमरी पोलीस ठाण्यातील हवालदार सुनील गोपाळराव कोलबुद्धे आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल मोहम्मद आवेज मोहम्मद मोईज हे दोघे २३ जून रोजी उमरी ते धर्माबाद रस्त्यावर शासकीय दुचाकी वाहनावर कर्तव्य बजावत होते. त्यावेळी त्यांनी अनेक वाहनधारकांकडून थेट वसुली केल्याचा प्रकार पुढे आला. याबाबतचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. परिणामी संबंधित दोन्ही कर्मचाऱ्यांचे वर्तन गंभीर, गैरशस्तीचे आणि आक्षेपार्ह असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यांच्या या गैरवर्तनाबाबत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ तसेच महाराष्ट्र पोलीस नियम १९५६ मधील तरतुदीनुसार डॉ. पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी ३० जून रोजी या दोघांच्याही निलंबनाचे आदेश दिले आहेत.
आगामी काळात नांदेड जिल्हा पोलीस दलात कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन, भ्रष्टाचार अथवा शिस्तभंगास अजिबात पाठीशी घातले जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी दिला आहे. अशा प्रकारावर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट संदेश उमरी कारवाईतून देण्यात आला आहे. एकूणच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्याबाबत ऐकावयास मिळालेल्या बाबी प्रत्यक्षात अनुभवायला मिळत आहेत. परिणामी पोलिसांमध्ये आता कर्तव्याबाबत खबरदारी बाळगली जात आहे.



