
नांदेड – नांदेड जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी आज गुरूवारी पदभार स्वीकारला. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे महेश पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. पाटील यांच्या नियुक्तीने नांदेड जिल्हा परिषदेवरील जवळपास सहा वर्षांचा महिला प्रशासकीय कार्यकाळ अखेर संपुष्टात आला आहे.
महेश पाटील हे यापूर्वी सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. शासनाने त्यांची नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली. गुरुवारी सकाळी १० वाजता त्यांनी जिल्हा परिषद कार्यालयात पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेतील सर्व खातेप्रमुखांची बैठक घेऊन विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. शासनाच्या लोकाभिमुख योजना प्रभावीपणे राबविणे, विकासकामांना गती देणे, तसेच नागरिकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी दिल्या. तसेच शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश देशमुख, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे उपआयुक्त डॉ. डी. बी. खुणे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रवीणकुमार घुले, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक मयूरकुमार आंदेलवाड, जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, कार्यकारी अभियंते खराडे, संजय शिंदे व बालाजी पवार, व्यंकटराव चव्हाण, दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अवधूत गंजेवार, नियोजन विभागाचे शिक्षणाधिकारी दिलीपकुमार बनसोडे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
तीन महिला अधिकाऱ्यांमध्ये वर्षा ठाकूर यांचा कार्यकाळ ठरला उल्लेखनीय…नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वर्षा ठाकूर यांनी २८ सप्टेंबर २०२० रोजी पदभार स्वीकारला होता. त्यांचा कार्यकाळ २२ जुलै २०२३ संपला. त्यांची लातूर जिल्हाधिकारी पदी बदली झाली. त्यानंतर २२ जुलै २०२३ रोजी मिनल करणवाल यांच्याकडे नांदेड जिल्हा परिषदेची सूत्र गेली. २० मार्च २०२५ पर्यंत जिल्हा परिषदेचा कार्यकाळ सांभाळला. २० मार्च २०२३ ते २ जुलैपर्यंत मेघना कावली या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. या दोन्ही आयएएस अधिकारी असल्या तरी त्यांच्या कार्यकाळात कोणत्याही योजनेचे काम जिल्ह्यात प्रभावीपणे होऊ शकले नाही. यामध्ये केवळ वर्षा ठाकूर यांचा कार्यकाळ हा प्रशासकीयदृष्ट्या उल्लेखनीय ठरला. त्यानंतर नांदेड जिल्हा परिषदेवर प्रशासकीय राजवट असतानाही इतर दोन्ही महिला अधिकाऱ्यांना नांदेडमध्ये प्रभावी कामगिरी करता आली नाही. नांदेडसारख्या मोठ्या जिल्ह्यात काम करण्याची मोठी संधी या अधिकाऱ्यांना होती. त्यांच्या अधिनस्त अधिकाऱ्यांनीच जिल्हा परिषदेचा गाडा हवा तसा हाकला. आता जिल्हा परिषदेवरील महिला प्रशासकीय राजवट आता संपुष्टात आली आहे. महेश पाटील हे पुण्याच्या सारथी तून नांदेडला रुजू झाले आहेत. आगामी काळात पाटील हे जिल्हा परिषदेचे सारथ्य नेमके कसे करतात याकडे लक्ष लागले आहे.



