क्राईम

इतवारा पोलिसांनी पकडला नशेच्या गोळ्यांचा मोठा साठा..!

स्थानिक गुन्हा शाखेने केलेल्या कारवाईच्या तपासात आरोपीकडे आढळला आणखी ७७१ ग्रॅम गांजा, पोलिसांच्या घरझडतीत १ लाख ६० हजार रुपयांच्या सापडल्या नशेच्या गोळ्या

नांदेड – स्थानिक गुन्हा शाखेने कारवाई करत १ किलो ४० ग्रॅम पकडून तेलंगणातील एका युवकावर कारवाई करून २९ जून रोजी इतवारा ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्याच्या तपासात इतवारा पोलिसांनी कारवाईला पुढे घेऊन जात आणखी ३८ हजार ५५० रुपयांचा गांजा तर १ लाख ६० हजार पाचशे रुपयांच्या प्रिगालॅब अर्थात नशेच्या गोळ्या जप्त केल्या आहेत. या कारवाईत एक तलवार सापडली असून इतवारा पोलिसांनी दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात विनोद जोंधळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून मुख्य आरोपी असलेली पूजा जोंधळे अद्यापही पोलिसांच्या हाती लागली नाही.

जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याविरुद्धच्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हा शाखेने २९ जून रोजी जुन्या नांदेडातील देगलूर नाका पशुवैद्यकीय दवाखान्याच्या मोकळ्या जागेत गांजाची विक्री करीत असलेल्या मोहम्मद अमीर मोहम्मद इस्माईल या बोधन तालुक्यातील युवकाला पकडून त्याच्याकडून १ किलो ४० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला होता. या कारवाईत ५२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हा गांजा त्याने शांतीनगर येथील पूजा जोंधळे या महिलेकडून खरेदी केला असल्याचे सांगितले होते. या प्रकरणाच्या तपासात इतवारा पोलीस ठाण्याचे तपासीक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक देशमुख हे आरोपी पूजा जोंधळे या महिलेचा शोध घेण्यासाठी तिच्या घरी गेले असता तेथे ती आढळून आली नाही. घराची झडती घेतली असता तेथे असलेला विनोद जोंधळे हा एका गोणीवर संशयास्पद बसलेला आढळून आला. त्या संशयावरून ती गोणी तपासली असता त्यामध्ये ६ हजार ५०० प्रिगालॅब या नशेच्या गोळ्या आढळल्या तसेच ७७१ ग्राम गांजाही सापडला आहे. या घरातून एक तलवार आणि वजन काटा आढळून आला आहे.

पोलिसांनी या कारवाईत २ लाख ५० हजार रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात विनोद जोंधळेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पूजा जोंधळेचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे, पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिंदे, पोलीस उपनिरीक्षक देशमुख, उपनिरीक्षक जळबाजी गायकवाड तसेच डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण आगलावे, सहायक पोलीस उपनिरीक्षक बेग, पोकॉ. जगताप, रिठेवाड, कोळनुरे, कदम, महिला पोलीस कांबळे शिंदे आदींनी केली.

नांदेडमध्ये नशेच्या गोळ्यांचा मोठा बाजार सुरू असल्याची बाब या कारवाईनंतर उघडकीस आली आहे. शहरातील अनेक भागात नशेच्या गोळ्याची विक्री केली जात होती. तत्कालीन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी या नशेच्या गोळ्यांच्या अवैध विक्री प्रकरणात अनेक औषधी दुकानांवर कारवाई केली होती. या कारवाईसाठी विशेष पथकाची स्थापना केली होती. त्यावेळी ही विक्री काही प्रमाणात कमी झाली होती. आता पुन्हा एकदा नशेच्या गोळ्या विक्री करून तरुणाईला व्यसनाधिनतेकडे नेले जात असल्याचे दिसून येत आहे. आता पुन्हा एकदा या अवैध नशेच्या गोळ्या विक्री प्रकरणात पोलिसांना धाडसत्रच सुरू करावे लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!