आरोग्य

नांदेड जिल्ह्यात गर्भवती महिलांचे ट्रॅकिंग सुरू..!

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा 'ॲक्टिव्ह मोड'वर, पहिली किंवा दोन मुली असणाऱ्या गर्भवती महिलांवर राहणार विशेष 'वॉच', आशा सेविका आणि अंगणवाडी ताईंवर सोपवली जबाबदारी

नांदेड- गर्भलिंगनिदान आणि स्त्रीभ्रूणहत्या या सामाजिक कलंकाला पूर्णपणे आळा घालण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी मोहिमेची नांदेड जिल्ह्यात वेगाने अंमलबजावणी सुरू आहे. ज्या कुटुंबात पहिली मुलगी किंवा दोन मुली आहेत, अशा गर्भवती महिलांचे प्रसूतीपर्यंत ट्रॅकिंग (नियमित देखरेख) करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या मोहिमेला आता चार महिने पूर्ण होत आले आहेत. या अंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे ‘ॲक्टिव्ह मोड’वर आली आहे.

आशा आणि अंगणवाडी ताईंवर मुख्य जबाबदारी
या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागातील आशा सेविका आणि अंगणवाडी ताई यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गर्भवती महिलेची नोंदणी झाल्यापासून तिच्या प्रसूतीपर्यंत प्रत्येक महिन्याला तिचा नियमित फॉलोअप घेतला जात आहे. विशेषतः पहिली किंवा दोन मुली असलेल्या कुटुंबांतील गर्भवती महिलांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.
सोनोग्राफी केंद्रांची होणार बारकाईने तपासणी
केवळ कायदे करून स्त्रीभ्रूणहत्या पूर्णपणे थांबलेली नसल्याचे समोर आल्यानंतर शासनाने हे थेट देखरेखीचे पाऊल उचलले आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून छुप्या मार्गाने होणारे गर्भलिंगनिदान रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी केंद्रांचीही आता आरोग्य विभागाकडून अत्यंत बारकाईने तपासणी केली जाणार आहे. संशयास्पद प्रकरणांवर विशेष लक्ष ठेवून कडक कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. जिल्ह्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातही आरोग्य अधिकारी स्वतः या मोहिमेचा आढावा घेत असून, आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. या मोहिमेमुळे जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदरात सुधारणा होईल आणि बेकायदेशीर गर्भपाताच्या प्रवृत्तीला चाप बसेल, असा विश्वास प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!