महापालिका

हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर नांदेड मनपा आयुक्त ॲक्शन मोडमध्ये, महापौर मात्र बिनधास्त..!

सखल भागांची प्रत्यक्ष पाहणी करत आपत्ती व्यवस्थापनाचा घेतला आढावा, लोकप्रतिनिधी निधीच्याच प्रतिक्षेत

नांदेड :- भारतीय हवामान विभागाने नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यात पुढील काही दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षा आणि संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी शनिवारी शहरातील विविध सखल, नदीकाठच्या आणि सखल भागांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करून आपत्ती व्यवस्थापन सज्जतेचा सविस्तर आढावा घेतला. दुसरीकडे महापौर मात्र शहरातील पूर परिस्थितीबाबत गंभीर नसल्याचे दिसत आहे. ना कोणता आढावा ना कोणती पाहणी.. सर्व काही प्रशासन भरोसे असेच चित्र आहे.

मुंबईत पावसाने थैमान घातले आहे. मुंबईत महिला महापौर आहेत. या संकटाच्या काळात त्या रस्त्यावर उतरून पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत. पावसाच्या या सर्व पार्श्वभूमीवर नांदेड महापालिका आयुक्त प्रशासकीय पातळीवर तयारीत गुंतले आहेत. शुक्रवारी महापालिकेत त्यांनी बैठक घेतली. शनिवारी प्रत्यक्ष पाहणीसाठी आपली टीम घेऊन शहरातील विविध भागात फिरत होते. यावेळी नगरसेवक मात्र बेपत्ता होते.

नांदेडमध्ये  जवळपास तीन वर्षांच्या प्रशासकीय कालावधीनंतर नांदेड महापालिकेच्या निवडणुका झाल्या. महापौरांसह इतर सर्व पदाधिकारी निवडण्यात आले. शहरवासीयांना आता आपले प्रतिनिधी मिळाले, अशी भावना निर्माण झाली होती. हे प्रतिनिधी आपले काम पूर्ण करतील अशी अपेक्षा होती. त्याचवेळी संकटाच्या काळात आवश्यक त्या उपाययोजना करून समस्या सोडवतील असे वाटत होते. मात्र महापालिकेचे प्रमुख पदाधिकारी गेल्या सहा महिन्यापासून कोणतेच काम झाले नाही, कोणताही निधी मिळाला नाही अशीच ओरड करत आहेत. महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत एका माजी पदाधिकाऱ्यांनी आणि ज्यष्ठ सदस्याने गेल्या चार महिन्यात सर्वच नगरसेवक निधीची वाट पाहत आहेत असल्याचे सांगून त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. तीन वर्षाच्या प्रशासकीय कालावधीनंतर निवडून आलेल्या सदस्यांकडून नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल, अशी अपेक्षा होती; मात्र सध्याचे चित्र पाहता ती फोल ठरत आहे.

दुसरीकडे वर्षभराची मुदतवाढ मिळालेल्या महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी शनिवारी सकाळीच शहरातील पूरप्रवण क्षेत्र, मुख्य नाले आणि गोदावरी नदीकाठच्या सखल भागांची पाहणी केली. त्यात प्रामुख्याने उर्दू घरानजिकचा नाला, असदवन ते लातूर फाटा नाला, रविनगर ते कौठा पोलीस चौकी व शगून सिटी या भागांचा समावेश होता. यावेळी शगुन सिटीमधील नागरिकांसोबत आयुक्तांनी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या पाहणी दौऱ्यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, शहर अभियंता सुमंत पाटील, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. मिर्झा फरहतुल्ला बेग, कार्यकारी अभियंता दिलीप टाकळीकर, क्षेत्रिय अधिकारी रावण सोनसळे, कनिष्ठ अभियंता ठानेदार आदी उपस्थित होते.

महानगरपालिका आयुक्तांनी नांदेड शहरवासीयांना आवाहन केले आहे, हवामान खात्याच्या इशाऱ्याचा विचार करता नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. तसेच, कोणत्याही आपत्कालीन मदतीसाठी किंवा पाणी साचल्याची तक्रार नोंदवण्यासाठी महानगरपालिकेच्या अधिकृत आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाईन क्रमांकावर (०२४६२ – २४२८०३ / २३५०७७) संपर्क साधावा. अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी नाल्यांची सफाई, पाणी वाहून जाण्याचे मार्ग आणि ज्या भागात पाणी साचण्याची शक्यता असते, अशा ठिकाणांना भेटी देऊन अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. नाल्यांमध्ये कचरा अडकून पाणी तुंबू नये, यासाठी अतिरिक्त सफाई कर्मचारी आणि यंत्रसामग्री तैनात करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्याचप्रमाणे आयुक्तांनी मनपाचा मुख्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष तीन शिफ्टमध्ये २४ तास सुरू राहिल याची दक्षता घेण्यासह सर्व झोनल अधिकाऱ्यांनी व अभियंत्यांनी मुख्यालय न सोडण्याचे आदेश दिले आहेत.

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!