नांदेड : श्रावण मासानिमित्त किनवट तालुक्यातील कैलास टेकडी व सहस्त्रकुंड येथील महादेवाचे दर्शन घेऊन तेलंगणा राज्यातील पारडी (बी) गावाकडे परतत असताना दिपला नाईक तांड्याजवळ सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास जीपचालकाचे नियंत्रण सुटून जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर उपचारासाठी नेत असताना चालकाचाही मृत्यू झाला. या अपघातात अन्य सहाजण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तेलंगणा राज्यातील म्हैसा येथे हलविण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील पारडी (बी) येथील भाविक श्रावण मासानिमित्त ३१ ऑगस्ट रोजी किनवट तालुक्यातील कैलास टेकडी येथे महादेवाच्या दर्शनासाठी आले होते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ते कैलास टेकडीवरून सहस्त्रकुंडकडे रवाना झाले. सहस्त्रकुंड येथे पोहोचल्यानंतर महादेवाचे दर्शन घेऊन ते ए.पी. २५ ए.एच. ६७४७ क्रमांकाच्या महिंद्रा कंपनीच्या कमांडर जीपने सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पारडी (बी) गावाकडे परतीच्या प्रवासाला निघाले.
दरम्यान, दिपला नाईक तांड्याजवळ चालकाचा जीपवरील ताबा सुटल्याने भरधाव जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार आदळली. हा अपघात इतका भीषण होता की जीप चक्काचूर झाली आहे. अपघातस्थळीवरील दृश्य मन विचलित करणारे होते. अपघातात तुम सायलू (वय ७०), तुम गौराबाई (वय ६०) आणि आऊला गंगन्ना (वय ७५), सर्व रा. पारडी (बी) तेलंगणा यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातातील चालकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अन्य सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी वाहनांच्या मदतीने पुढील उपचारासाठी तेलंगणा राज्यातील म्हैसा येथे हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक व तेलंगणा पोलीस रुग्णवाहिकेसह दाखल झाले.