महापालिका

अबब..! नांदेड महापालिकेत कार्यालयीन वेळेत ५४ कर्मचारी गैरहजर

२४ तासांच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश, उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपासणी पथक झाले सक्रिय, समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्यास शिस्तभंगासह दंडात्मक कारवाई केली जाणार

नांदेड – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये शिस्त, एकरूपता आणि सेवेची गुणवत्ता राखणे तसेच नागरिकांना जलद व कार्यक्षम सेवा उपलब्ध करून देणे या उद्देशाने मनपा प्रशासनाने सोमवारी एक मोठी आणि धडक कारवाई केली. महानगरपालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या आदेशान्वये करण्यात आलेल्या तपासणीत कार्यालयीन वेळेत गैरहजर आढळलेल्या तब्बल ५४ कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे.

प्रशासकीय कामकाजात गतिशीलता आणण्यासाठी आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अभिजित वायकोस यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष ‘तपासणी पथक’ गठीत करण्यात आले आहे. या पथकाने सोमवार ३१ ऑगस्ट रोजी सकाळी कार्यालयीन वेळेत महानगरपालिकेच्या विविध विभागांची अचानक पाहणी केली. या तपासणी दरम्यान शासनाने ठरवून दिलेल्या वेळेचे उल्लंघन करून एकूण ५४ कर्मचारी कार्यालयात वेळेवर हजर नसल्याचे आढळून आले. कार्यालयीन नियमांचे आणि शिस्तीचे उल्लंघन करणाऱ्या या सर्व ५४ कर्मचाऱ्यांची गंभीर दखल घेत प्रशासनाने त्यांना तात्काळ ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी केली आहे.

महानगरपालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या या गैरशिस्तीबद्दल आणि नियमांच्या उल्लंघनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “तुमच्यावर शिस्तभंगाची व दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये?” अशी विचारणा या नोटिसीद्वारे करण्यात आली आहे. नोटीस मिळाल्यापासून २४ तासांच्या आत संबंधित कर्मचाऱ्यांनी यावर आपला लेखी खुलासा सादर करावा, असे सक्त निर्देश देण्यात आले आहेत. विहित मुदतीत समाधानकारक खुलासा न आल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कडक प्रशासकीय व दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत एक विशेष समिती गठित करण्यात आल्याची माहिती आठ दिवस आधीच देण्यात आली होती. विशेष समितीबाबत माहिती असतांनाही अनुपस्थित कर्मचाऱ्यांचा हा आकडा चक्रावणाराच आहे. एकूणच महापालिकेतील सामान्य प्रशासन विभागाचा आणि त्याचवेळी विभाग प्रमुखांचाही आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांवर किती वचक आहे हे या विशेष समितीच्या तपासणीतून स्पष्ट झाले आहे. महापालिका मुख्यालयातील कर्मचाऱ्यांची कार्यालयीन वेळेतील उपस्थिती बाबतची ही अवस्था असेल तर महापालिकेतील ६ क्षेत्रिय कार्यालयात काय परिस्थिती असेल याचा अंदाज येत आहे. अशीच तपासणी क्षेत्रिय कार्यालयातील उपस्थिती, गणवेश, ओळखपत्र याबाबत करावी अशी मागणीही पुढे आली आहे. क्षेत्रिय कार्यालयातील अनेक महाभाग हे ११ वाजेपर्यंतही कार्यालयात पोहोचत नसल्याच्या तक्रारी आहेत.

सलग तीन दिवसांच्या सुट्टया उपभोगल्यानंतरही सोमवारी कर्मचाऱ्यांची कर्तव्यावर वेळीच हजर राहण्याची मानसिकता निश्चितच तयार झाली नव्हती. महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे, कार्यालयीन शिस्त व सेवेची गुणवत्ता राखण्यासाठी शासनाच्या नियमांनुसार कर्मचाऱ्यांनी वेळेचे पालन करणे सक्तीचे आहे. ज्यामध्ये वर्ग-३ संवर्गातील कर्मचारी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत कार्यालयात हजर राहणे बंधनकारक आहे. तर वर्ग-४ संवर्गातील कर्मचारी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत कार्यालयात हजर राहणे आवश्यक आहे. याशिवाय, कर्तव्यावर असताना प्रत्येक कर्मचाऱ्याकडे त्याचे अधिकृत ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. तसेच वर्ग-४ संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांनी शासनाने निर्धारित केलेल्या राष्ट्रीय गणवेशातच उपस्थित राहणे आवश्यक आहे.

नागरिकांच्या सेवेला प्राधान्य:  आयुक्त डॉ. डोईफोडे महानगरपालिका हे नागरिकांना मूलभूत सेवा देणारे मुख्य केंद्र आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची लेट-लतीफ, गणवेश व ओळखपत्राबाबतचा हलगर्जीपणा अजिबात सहन केला जाणार नाही. प्रशासकीय कामात पारदर्शकता, वेळ आणि शिस्त राखण्यासाठी अशा प्रकारच्या अचानक तपासण्या यापुढेही सातत्याने सुरू राहतील, असे मनपा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कार्यालयीन शिस्तीबाबत कर्मचाऱ्यांनी गंभीर रहावे, कोणत्याही परिस्थितीत बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही, असे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी स्पष्ट केले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!