
नांदेड – लोहा उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाला असून वैद्यकीय अधीक्षक, डॉक्टर मुख्यालयी राहत नाहीत, वेळेवर रुग्णांना उपचार मिळत नाहीत अशा अनेक तक्रारी रुग्ण तसेच नातेवाईकाकडून आल्या. या सर्व तक्रारींची दखल घेत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी रविवारी रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयातील असुविधा, तक्रारींचा ढीग पाहता चिखलीकर यांनी स्वतः राज्याच्या आरोग्य सचिवाला येथील वैद्यकीय अधीक्षक व डॉक्टरांची बदली करा अशी सूचना केली. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी लक्ष घालावे तसेच पाण्याची तात्काळ सुविधा करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
लोहा उपजिल्हा रुग्णालयाच्या वाढत्या तक्रारींची दाखल घेत आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी रविवारी येथे भेट दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अब्दुल बारी, मुख्याधिकारी श्रीकांत लोळगे, माजी सभापती खुशाल पाटील पांगरीकर, माजी उपनगराध्यक्ष दता वाले, भास्कर पाटील, पंचशील कांबळे, डॉ. लोहारे, बी. डी. जाधव आदी उपस्थिती होते.
लोहा रुग्णालयात आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. वैद्यकीय अधीक्षक राहत नाहीत आणि डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसतात. त्यामुळे रुग्ण व नातेवाईक त्रस्त झाले आहेत. अनेकदा रुग्ण, नातेवाईकांनी आ. चिखलीकर यांच्याकडे डॉक्टर नाहीत, रुग्णांना कोणीही तपासत नाही, पाण्याची सोय नाही अशा अनेक तक्रारी केल्या. त्याची तातडीने दाखल घेत रखरखत्या उन्हात रविवारी दुपारी आमदार प्रतापराव यांनी लोहा उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली
रुग्णालयातील असुविधा पाहून त्यांनी थेट राज्याचे आरोग्यमंत्री यांनाच फोन केला. त्यानंतर राज्याचे आरोग्य सचिव यांना लोहा उपजिल्हा रुग्णालय म्हणजे राज्यातील सर्वात असुविधा देणारे हॉस्पिटल आहे. त्यामुळे येथील वैद्यकीय अधीक्षक यांना तात्काळ बदला तसेच डॉक्टर, कर्मचाऱ्यांची अन्यत्र बदली करा. त्यांच्यामुळे माझ्या भागातील जनतेला आरोग्य सेवा मिळत नाही. यावर तातडीने कार्यवाही व्हावी असे सांगितले.
येत्या आठवड्यात मुंबईत आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक…जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांना या रुग्णालयाकडे लक्ष देण्याच्या सूचना केल्या. एका हंगामी डॉक्टरबाबत जाहीरपणे निर्देश दिले. रुग्णालयात पाण्याची सोय नाही त्यावर तात्काळ उपाय योजना करावी असे मुख्याधिकारी श्रीकांत लोळगे याना निर्देश दिले .लोह्याच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या सुविधाबाबत येत्या आठवड्यात मुंबईत आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक घेऊ व येथील रुग्णालयात अद्यावत आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करू असे आ. चिखलीकर यांनी आश्वासित केले.