आरोग्य

नांदेड जिल्ह्यातील १० तालुक्यात आजपासून हत्तीरोग दुरीकरण औषधोपचार मोहीम

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सूचनानुसार गोळ्या खाण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन

  1. नांदेड : जिल्ह्यात आजपासून दहा तालुक्यात हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम सुरू होणार आहे. या मोहिमेत नागरिकांना वयोमानानुसार गोळ्यांची मात्रा दिली जाणार असून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सूचनेनुसार या गोळ्यांचे सेवन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

नांदेड जिल्हा हा हत्तीरोग जोखीमग्रस्त जिल्हा आहे. या जिल्ह्यातील वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना या आजाराचा धोका होवु शकतो. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे सन २००४ पासून दरवर्षी हत्तीरोग एकदिवसीय सामुदायिक औषधोपचार मोहिम नांदेड जिल्ह्यात राबविली जाते. या वर्षी मात्र जिल्ह्यातील किनवट, माहूर, भोकर, हदगाव, हिमायतनगर, कंधार, नायगाव, बिलोली, देगलूर आणि मुखेड या दहा तालुक्यात ही मोहीम राबविण्यात येत आहे. २६ मार्च रोजी गावातील बुथवर गोळया वाटपाचे नियोजन करण्यात येत आहे. लगेच दुसऱ्या दिवशीपासून आरोग्य खात्यातील आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, अंगणवाडी कार्यकर्ता, आशा स्वयंसेविका व इतर स्वंयसेवक २७ मार्च ते ०५ एप्रिल २०२४ दरम्यान आपल्या घरी येतील. वयोमानाप्रमाणे आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार डीईसी आणि अलबेंडाझॉल या गोळ्यांची मात्रा आरोग्य कर्मचाऱ्यासमक्ष घेवुन शासनाच्या या राष्ट्रीय मोहिमेस प्रतिसाद द्यावा व हत्तीरोगापासुन मुक्त रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.

हत्तीरोग हा दीर्घ मुदतीचा व व्यक्तीची एकूणच शारिरीक व मानसिक क्षमता कमी करणारा आजार आहे. हा आजार “बुचेरेरिया बँक्रॉप्टाय” व “ब्रुगीया मलायी” या नावाच्या कृमीमुळे होतो. याचा प्रसार क्युलेक्स क्विकिफॅसिएटस् या डासाच्या मादीपासून होतो. हत्तीरोग झाल्यास रोग्यास अपंगत्व व विद्रुपता येते, हातापायावर सुज, जननेंद्रीयावर व इतर अवयवावर कायमची सूज येवून विद्रुपता येते. त्यामुळे रुग्णास सामाजिक उपेक्षेस तोंड द्यावे लागते, आर्थिक नुकसान होते. त्यामुळे रुग्ण मानसिक दबावाखाली वावरतो. तसेच जन्मभर दुःख-वेदना सहन कराव्या लागतात.

नांदेड जिल्ह्यात दि. १६ ते ३१ ऑगस्ट २०२३ हत्तीरोग रुग्ण शोध मोहिम सर्वेक्षण करण्यात आले.या सन २०२३ च्या अहवालानुसार नांदेड जिल्ह्यात अंडवृध्दीचे रुग्ण २६५ व हत्तीपायाचे रुग्ण २ हजार २०८ असे एकूण २ हजार ४७३ हत्तीरोगाचे बाह्य लक्षणेयुक्त रुग्ण आहेत.नांदेड जिल्हा हत्तीरोगासाठी जोखीमग्रस्त असल्याने तसेच जिल्ह्यात हत्तीरोग जंतूंचे संक्रमण चालु असल्याने हत्तीरोगाचा धोका आहे. यावर एकच उपाय म्हणजे प्रत्येक नागरिकांनी शरिरात मायक्रोफायलेरीयाचे जंतू असोत किंवा नसोत, हत्तीरोगाचे लक्षणे असोत किंवा नसोत अशा सर्व पात्र लाभार्थ्यांना वयोमानानुसार डीईसी गोळ्या व अलबेंडाझॉल गोळयाची एक मात्रा वर्षातून एकदा खाणे आवश्यक आहे. फक्त दोन वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रियांना व अतिगंभीर आजारी रुग्णांना हा औषधोपचार देण्यात येत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!