
- नांदेड – आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ रिपब्लिकन नेते ॲड. मा.मा. येवले यांचे आज सकाळी ९.३० वाजता वार्धक्याने निधन झाले. ॲड. मा.मा. येवले ८७ वर्षांचे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १९५६ च्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्यात बौद्ध धम्माचा स्वीकार आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या महानिर्वाण समयी चैत्यभूमी येथील उपस्थितीनंतर ॲड. मा.मा. येवले हे आंबेडकरी चळवळीचा आयुष्यभर झंजावात होऊन फिरले. चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चितेसमोर त्यांनी अविवाहित राहून रिपब्लिकन चळवळीचा झेंडा खांद्यावर घेण्याचा संकल्प केला.
महाराष्ट्र दुय्यम सेवा निवड मंडळ आणि मराठवाडा प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळावर १२ वर्षे नि:स्पृहपणे सेवा बजावत सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना मुख्यमंत्री वसंतराव नाईक समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविले आहे. माजी राज्यपाल तथा रिपब्लिकन पार्टीचे सर्वेसर्वा दिवंगत दादासाहेब रा. सु. गवई यांचे ते निकटवर्ती होते. दादासाहेब गवई यांनी भोपाळ येथील रिपाइंच्या अधिवेशनात त्यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली होती. ते प.पू. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे आजीवन विश्वस्त राहिले.
ॲड. मा.मा. येवले यांचा नांदेड येथील देगावचाळ भागात २१ जानेवारी १९३९ रोजी जन्म झाला. भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेतलेले ॲड. मा.मा. येवले हे उच्च विद्याविभूषित होते. राजकारण समाजकारण याचबरोबर ॲड. मा.मा. येवले यांनी बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसारात आपल्या उमेदीच्या काळात अतुलनीय योगदान दिले. त्यांनी जागतिक बौद्ध परिषद बॅंकॉक, थायलंड, श्रीलंका आणि नेपाळच्या काठमांडू येथील बौद्ध परिषदांत प्रतिनिधीत्व केले. दिवंगत ॲड. मा.मा. येवले यांचे पार्थिव देगावचाळ येथील प्रज्ञा करुणा विहार येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. उद्या दिनांक २७ मार्च रोजी दुपारी २ वाजता त्यांच्या पार्थिवाची अंतिम यात्रा काढण्यात येणार आहे. देगावचाळ, कलामंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालय, महावीर चौक, मुथा चौक, पोलीस परेड ग्राउंड, देगावचाळ ते भीमघाट बौद्ध विहार हा अंत्ययात्रेचा मार्ग राहणार आहे. भीमघाट येथील बौद्ध विहार शेजारी गोदावरी नदी काठावर ॲड.मा.मा. येवले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे कनिष्ठ बंधू नांदेड महानगरपालिकेचे माजी उपायुक्त प्रकाश येवले यांनी ही माहिती दिली. ॲड.मा.मा. येवले यांच्या पश्चात ४ भाऊ, ३ बहिणी असा मोठा परिवार आहे.
मान्यवरांचा शोकसंदेश
रिपब्लिकन चळवळीत आयुष्य वेचणारे ॲड.मा.मा. येवले यांच्या निधनाचे वृत्त पसरताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, ॲड. प्रकाश आंबेडकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रा. डॉ. कमलताई गवई, प्रा. जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आदींनी येवले कुटुंबीयांना शोक संवेदना कळवल्या आहेत.