
नांदेड – नांदेड लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी झालेल्या मतदानाच्या अंतिम टक्केवारीची प्रतीक्षा केली जात आहे. या टक्केवारीच्या माहितीनंतर राजकीय विश्लेषक आपापल्या पद्धतीने जय- पराजयाचे आराखडे मांडत असतात. नांदेड लोकसभा मतदारसंघात सरासरी ६५ टक्के मतदान झाल्याचा प्रार्थमिक अंदाज आहे. यात काही प्रमाणात बदल अपेक्षित आहे. मात्र अंतिम आकडेवारी ही निवडणूक आयोगाच्या छाननीनंतर निवडणूक आयोग एकत्रितरित्या जाहीर करत असते.
महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात आठ मतदारसंघात मतदान झाले आहे. या मतदान झालेल्या आठ मतदारसंघाची एकत्रितरित्या माहिती जाहीर केली जाईल असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले आहे. सध्या फक्त अंदाजित आकडेवारी उपलब्ध आहे. दुसऱ्या टप्प्यातील सर्व लोकसभा मतदारसंघांची एकत्रित माहिती आयोगाकडूनच घोषीत केली जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत निवडणूक आयोगाकडून शनिवारी सायंकाळपर्यंत ही आकडेवारी घोषित होईल.