
नांदेड – कंधार तालुक्यातील कौठा येथे १५ जूनच्या पहाटे पाच ते सहा जणांनी टाकलेल्या दरोड्यात सोन्या-चांदीचे दागिने आणि नगदी रक्कम असा एकूण ४१ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणात नांदेड स्थानिक गुन्हा शाखेने सहा आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ४० तोळे सोने, रोख साडेआठ लाख रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. या दरोड्यातील आणखी चार आरोपी पोलिसांना हवे आहेत.
कंधार तालुक्यातील कौठा येथील व्यापारी गजानन श्रीहरी येरावार यांच्या घरी शस्त्राचा धाक दाखवून १५ जूनच्या पहाटे पाच ते सहा आरोपींनी रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने आदी ४१ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखा तपास करत होती. वेगवेगळे पथके करून आरोपींचा शोध सुरू होता. आरोपींच्या शोधात महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान राज्यातही ही पथके पोहोचली. या दरोडातील काही आरोपी नांदेड आणि काही आरोपी परभणी येथे असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सोनूसिंग बलवीर सिंग भोंड वय २२, रा. उदनानगर सुरत गुजरात, जयसिंग शेरासिंग बावरी वय २०, रा. दंतेश्वर संतोषवाडी बडोदा गुजरात, अरुण नागोराव गोरे वय ४५, रा. उस्माननगर ता. कंधार, शेख खदीर शेख मगदूमसाब वय ५०, रा. इकबालनगर धनेगाव ता. जि. नांदेड, राजासिंघ हिरासिंग टाक वय २२ वर्ष, रा. अण्णाभाऊ साठेनगर जिंतूर रोड परभणी आणि गुरुमुखसिंग हिरासिंग टाक वय २५, रा. नवा मोंढा जिंतूर रोड परभणी यांना ताब्यात घेतले. त्यांना कौठा दरोड्याबाबत विचारपूस केली असता यातील फरार आरोपी सतबिरसिंग बलवंत सिंग टाक रा. अकोला, जसपालसिंग हरिसिंग जुन्नी रा. परतुर जि. जालना, राजपालसिंग दुधानी रा. सिंदखेडराजा जि. बुलढाणा आणि सरदारखान अमीरउल्लाखान रा. पुसद जि. यवतमाळ तसेच मॉन्टीसिंग रा. धुळे यांनी मिळून हा गुन्हा केल्याचे कबूल केले. अरुण गोरे हा कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील रहिवासी आहे. त्यानेच या प्रकरणात रेकी करण्याचे काम केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी या आरोपीकडून गुन्ह्यात गेलेल्या मालापैकी ४०५ ग्रॅम सोन्याचे दागिने, ५५ ग्राम चांदीचे दागिने आणि रोख ८ लाख ५० हजार रुपये असा एकूण २९ लाख ४३ हजार ४६१ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यावेळी त्यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली दोन वाहने जप्त केले आहेत. एकूण तीन मोबाईलही या प्रकरणात पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या कारवाईत पोलिसांनी ३४ लाख ८८ हजार ४६१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या आरोपीताना कंधार पोलिसांच्या हवाली करण्यात येणार असून उर्वरित फरार आरोपींनाही लवकरच अटक केले जाईल असे पोलीस अधीक्षक कोकाटे यांनी सांगितले. या आरोपीकडून आणखी काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सहायक पोलीस निरीक्षक संतोष शेकडे, रविकुमार वाहुळे, उपनिरीक्षक आनंद बिचेवार, साईनाथ पुयड, मिलिंद सोनकांबळे यांच्या पथकाने पार पाडली.