
नांदेड – लाडक्या बहिणीच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीने राबवलेल्या लाडकी बहीण स्नेह मेळाव्यात भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांची रविवारी नांदेड जिल्ह्यात प्रमुख उपस्थिती होती. मात्र आठ दिवसापूर्वीच भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणीवर उपाध्यक्ष, सरचिटणीस, सचिव, चिटणीस अशा प्रमुख पदावर नियुक्ती झालेल्या नांदेड जिल्ह्यातील आठ नूतन महिला पदाधिकाऱ्यांनी मात्र या लाडकी बहिण स्नेह मेळाव्याकडे पाठ फिरवली असल्याची बाब उघड झाली आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात आता भाजपाच्या प्रमुख नेत्यांमधील दरी आता दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र पुढे येत आहे.
नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे रविवारी विकी गार्डन मंगल कार्यालयात भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रणिता देवरे चिखलीकर यांनी लाडकी बहीण स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यास भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, नांदेड महानगरचे माजी जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, रिपाईचे प्रदेश उपाध्यक्ष विजय सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यास माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अध्यक्षस्थान भूषविले.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला. कंधार – लोहा मतदारसंघ हा माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा गड मानला जातो. त्यामुळे हा कार्यक्रम लोहा येथे ठेवण्यात आला. चिखलीकर हे लोहा मतदारसंघात प्रमुख उमेदवार आहेत. चिखलीकर यांनी तो मेळावा यशस्वीही केला. मात्र यात भाजपा महिला मोर्चातील नवे आणि जुने असा बेबनाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. भाजपा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ या कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित असतानाही नांदेड जिल्ह्यातील आठ नूतन महिला पदाधिकारी मात्र या मेळाव्याकडे फिरकल्याही नाहीत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आठ दिवसांपर्वीच भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणीवर महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती झालेली असताना खुद्द प्रदेशाध्यक्ष नांदेड जिल्ह्यात येतात आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी प्रदेश कार्यकारणीवर नुकत्याच निवड झालेल्या पदाधिकारी मात्र ना स्वागताला ना कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. त्यामुळे भाजपातील गटबाजी पुन्हा एकदा उघड झाली आहे. आठ दिवसांपूर्वी या महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले होते. माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले होते. त्यांच्याच शिफारशीनुसार या महिला पदाधिकाऱ्यांची प्रदेश कार्यकारणीवर महत्त्वाच्या पदावर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच प्रदेशाध्यक्षा या नांदेड जिल्ह्यात येत असताना त्यांच्याकडून किमान स्वागत तरी अपेक्षित होते. मात्र तसेही घडले नाही.
त्यामुळे भाजपातील वेगवेगळे गट कार्यरत असताना आता महिला मोर्चातील गटबाजीही प्रामुख्याने पुढे येत आहे. विधानसभा निवडणुका आणि लोकसभेच्या पोटनिवडणुका तोंडावर असताना ही गटबाजी भाजपाला निश्चितच परवडणारी नाही. त्यात नांदेड जिल्ह्यातील दोन प्रमुख नेत्यांमध्ये लोकसभेच्या निकालानंतर निर्माण झालेली दरी आता दिवसेंदिवस रुंदावतच जात आहे. नांदेड जिल्हा भाजपाचे नेतृत्व आता नेमके कोणाकडे आहे, कोणाचे नेतृत्व मान्य करावे याबाबतही भाजप कार्यकर्त्यांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तर काही पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मात्र आपला गट निश्चित केला आहे. त्यामुळे या गटाने त्या कार्यक्रमाला जायचे नाही आणि त्या गटाने या कार्यक्रमाला यायचे नाही हा अघोषित कार्यक्रम सध्या नांदेड जिल्हा भाजपामध्ये सुरू असल्याचे दिसत आहे.
आम्हाला निमंत्रणच नव्हते..! भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ या नांदेड जिल्ह्यात कार्यक्रमासाठी येतात मात्र त्या कार्यक्रमाचे आम्हाला कोणतेही निमंत्रण दिले नव्हते, असा खुलासा भाजपा महिला मोर्चाच्या नूतन प्रदेश उपाध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी केला आहे. स्थानिक पातळीवरून निमंत्रण येणे अपेक्षित नव्हते. मात्र प्रदेश कार्यकारणीकडून तरी आम्हाला चित्राताई वाघ यांच्या नांदेड जिल्हा दौऱ्याबाबत माहिती कळवणे, निरोप मिळणे अपेक्षित होते. मात्र तसे काही घडले नाही असेही त्या म्हणाल्या. आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आपण मतदार संघात बूथ कमिटी बैठकीस उपस्थित होते. केवळ मलाच नाही तर जिल्ह्यातील आठही नूतन महिला पदाधिकाऱ्यांना असा निरोप देण्यात आला नव्हता. त्यामुळे आम्ही आमच्या पूर्वनियोजित कार्यक्रमात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.