
नांदेड – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारापासून नांदेडमध्ये भारतीय जनता पार्टीत कोणतीही गटबाजी नाही असे ठासून सांगितले जात होते. मात्र पक्षांतर्गत गटबाजीचा प्रत्यय वारंवार येत होता. त्यात आम्ही सर्वजण एकच आहोत असे चित्रही वारंवार निर्माण केले जात होते. मात्र या परिस्थितीला अखेर तडा गेला असून शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी नांदेड विमानतळावरील यादीतून माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह त्यांच्या समर्थकांची नावे वगळल्याने आता अखेर पक्षांतर्गत वादाची ठिणगी पडली अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
भाजपा नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज ५ ऑक्टोबर रोजी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी नांदेडमार्गे रवाना झाले. सकाळी साडे दहा वाजता भारतीय वायु दलाच्या विशेष विमानाने त्यांचे नांदेड येथील श्री गुरू गोविंदसिंघजी विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी माजी मुख्यमंत्री, खा.अशोकराव चव्हाण, खा. डॉ. अजित गोपछडे, आ.बालाजी कल्याणकर, आ.भीमराव केराम, आ.डॉ. तुषार राठोड, आ.राजेश पवार, पोलीस महासंचालक बिपीनकुमार सिंग, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह मान्यवरांनी स्वागत केले. मात्र स्वागताच्या यादीत माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना स्थान दिले गेले नाही. चिखलीकर हे नांदेडमध्ये असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी ना परतीच्या प्रवासातही त्यांचे नाव समाविष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे आता नांदेडमध्ये माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी पुन्हा एकदा उचल खाल्ली असल्याचेच स्पष्ट होत आहे. मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात संपूर्ण पक्षाची धुरा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यावर होती. असे असताना लोकसभेतील पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नांदेडमधील स्वागताच्या यादीतूनही त्यांचे नाव वगळण्यात आले. हा प्रकार गंभीर असून तो जाणीवपूर्वक केला गेला असल्याची भावना अनेक चिखलीकर समर्थकांनी व्यक्त केली आहे.
माजी खासदार म्हणतात मी मतदार संघात…माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना या विषयात प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी मी मतदार संघात असल्याचे स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नांदेडमध्ये असताना आपण मतदारसंघात कसे? असाही प्रश्न विचारला असता आपल्याला याबाबत मेसेज नसल्याने आपण मतदार संघात पोहोचलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वागताच्या यादीबाबत आपल्याला काहीही माहित नाही असेही ते म्हणाले. जाणीवपूर्वक हा प्रकार घडला आहे का? या प्रश्नावर त्यांनी मी याबाबत काहीही सांगू शकत नाही असे उत्तर दिले.