
नांदेड – लेंडी प्रकल्प बाधित क्षेत्रात बुडालेल्या गावात थेट लष्कराकडून बचाव कार्य सुरू असताना आणखी एक थरकाप उडवणारी बातमी पुढे आली आहे. मुखेड – उदगीर तालुक्याच्या सीमेवरील धडकनाळ येथील पुलावरून रात्री १.४० वा. ४ पुरूष, ३ महिला कार व एका ऑटोसहित वाहून गेले. त्यापैकी ३ पुरुषांना स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत वाचविण्यात आले आहे. अजुनही एका पुरुषासह ३ महिला बेपत्ता आहेत. त्यांचे शोधकार्य सुरू आहे. लेंडीच्या बुडित क्षेत्रातील हसनाळ गावात मंगळवारी आणखी एका महिलेला मृतदेह सापडला आहे. चंद्रकला विठ्ठल शिंदे वय ४५ असे या मृत महिलेचे नाव आहे. येथील मृतांचा आकडा आता ४ वर गेला आहे.
मुखेड तालुक्यात ढगफुटीसदृश्य व अतिवृष्टीमुळे लातूर, उदगीर आणि कर्नाटक भागातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे. १८ ऑगस्ट रोजी मुखेड तालुक्यातील बा-हाळी महसूल मंडळात एकाच दिवशी ३५४.८ मिमी व मुक्रमाबाद मंडळात २०६.८ मिमी इतके विक्रमी पाऊस झाला. परिणामी लेंडी नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली.अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. १९ ऑगस्ट रोजी पुरस्थिती नियंत्रणात आहे.
पुनर्वसित रावणगाव, भासवाडी, भिंगोली व हसनाळ या गावांतील काही नागरिक मूळ ठिकाणी वास्तव्यास राहत असल्यामुळे पुराच्या पाण्यात अडकण्याच्या घटना घडल्या आहेत. रावणगाव येथे अंदाजे २२५ नागरिक पाण्याच्या वेढ्यामध्ये अडकलेले होते त्या सर्व नागरिकांना शोध व बचाव पथकाककडून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. हसनाळ येथे अंदाजे ८ अडकलेल्या नागरिकांना शोध व बचाव पथकाकडून सुखरूप बाहेर काढण्यात आले. सैन्य दलामार्फतही वैद्यकीय शिबिर लावून आरोग्य सुविधा देण्यात येत आहेत. भासवाडी येथे सुमारे २० नागरिक सुखरूप बाहेर काढण्यात आले. भिंगोली येथे सुमारे ४९ नागरिक सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. मुखेड तालुक्यात पुरामुळे लहान मोठी एकूण ५२ जनावरे दगावली आहेत. मयत व निराधार कुटूंबाची यादी व पंचनामे मदत देण्याच्या अनुषंगाने तयार करण्यात येत आहे.
मुखेड तालुक्यात जिल्हा प्रशासनाच्या शोध व बचाव पथक, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, पोलीस, अग्नीशमन दल, शीघ्र प्रतिसाद दल व स्थानिक शोध व तत्परतेमुळे जवळपास ३०० जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून सर्वजण सुरक्षित आहेत. सर्व विस्थापित नागरिकांची तात्पुरती निवास, भोजन व वैद्यकीय सुविधा विषयक व्यवस्था करण्यात आलेली आहे. उपविभागीय अधिकारी देगलूर व तहसीलदार मुखेड हेसुध्दा घटनास्थळी उपस्थित राहून बचाव कार्य करत आहेत. जिल्हा प्रशासन पूर्णतः सतर्क असून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे.
प्रशासनाच्या बळजबरी घळभरणीचा होतोय निषेध… रोहित पवारांनाही केला आरोप…लेंडी धरणाची घळभरणी लोकांचा विरोध डावलून करण्यात आली. पोलीस बळाच्या जोरावर घळभरणी करण्यात आली. त्यातून नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक त्या कोणत्याही सुविधा देण्यात आल्या नाही. तात्पुरत्या निवाऱ्यासाठी जवळपास ७ कोटी रुपये मंजूर केले खरे. प्रत्यक्षात कामच झाले नाही. परिणामी धरण क्षेत्रातील सहा गावे पाण्याखाली गेली. यातून जीवित हानी, मालमत्तेचीही प्रचंड हानी झाली आहे. या जीवित हानीस प्रशासकीय दडपशाहीच जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे आगामी काळात लेंडीच्या घळभरणीचा विषय गंभीर रूप घेणार हे निश्चित. नांदेडचे खासदार प्रा. रविंद्र चव्हाण यांनी सोमवारी पूरग्रस्त भागास भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली. त्यांनीही प्रशासकीय कारभाराचा निषेध केला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी लेंडीच्या पुराचे काही विदारक छाया समाजमाध्यमांवर टाकून शासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.



