
नांदेड – आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ता पंडित प्रदीप मिश्रा यांच्या बारा ज्योतिर्लिंग महा शिव महापुराण कथेला शुक्रवारी दुपारी बारा वाजता प्रारंभ झाला. या कथेसाठी नांदेडसह शेजारील जिल्हे, कर्नाटक, तेलंगणा आदी राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित झाले आहेत. दोन दिवसापासून या भाविकांनी सभामंडपातच मुक्काम ठोकला होता. मात्र शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपासूनच पावसाला प्रारंभ झाला आणि सभामंडपात पाणीच पाणी झाले. आता राहायचे कसे, थांबायचे कसे या चिंतेत असलेल्या भाविकांना नांदेड जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलीस प्रशासन यांनी तातडीने मदतीचा हात देत त्यांना सुरक्षीतस्थळी हलवले.
कौठा भागातील मोदी मैदानावर पंडित प्रदीप मिश्रा यांची श्रावण मासात शिवमहापुराण कथा ऐकण्याची संधी नांदेडसह शेजारील जिल्हे आणि आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा या राज्यातील भाविकांना मिळाली होती. ही संधी घेण्यासाठी हजारो भाविक दोन दिवसापासून नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. पहिला दिवस उत्साहात पार पडला. मात्र सायंकाळी जोरदार पावसाला प्रारंभ झाला. या पावसाचा जोर वाढतच गेला. त्यामुळे मुक्कामी राहिलेल्या भाविकांना या पावसाचा मोठा फटका बसला. सभा मंडपात पाणीच पाणी झाले. पावसाने भाविकांची तारांबळ उडाल्याची बाब जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त अजितपालसिंघ संधू आदींना मिळाली. ही माहिती मिळताच तातडीने सर्व अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले. इतकेच नव्हे तर आवश्यक ती सर्व साहित्य सामग्री घटनास्थळी पोहोचविण्यासाठी विभागांना आदेशित केले. त्यामुळे काही वेळातच मोदी मैदानावर जेसीबी मशीन, स्कूल बस तसेच इतर वाहन प्राप्त झाले. या वाहनातून भाविकांना कौठा भागात असलेल्या नागार्जुना पब्लिक स्कूल तसेच ओम गार्डन या मंगल कार्यालयात हलवण्यात आले.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसिलदार संजय वारकड, सर्व मंडळ अधिकारी नांदेड तालुका, सर्व तलाठी, अशी ६५ जणांची महसूल विभागाची टीम अवघ्या २० मिनिटात कार्यरत झाली. सभामंडपातील बाधित भक्तांना, खाजगी बसेसद्वारे, नागार्जुन स्कूल, ओम गार्डन येथे सुरक्षित स्थळी हलवित आले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या ५ बस मदत कार्यासाठी बोलवण्यात आल्या आहेत. प्राधान्याने, वृध्द, महिला, बालके यांना सुरक्षितस्थळी नेले जात आहे.या कामी पोलीस विभाग, मनपा यांचा समन्वय साधत, अधिकारी वर्ग परिस्थितीवर बारकाईने नजर ठेऊन असून, समय सूचकता बाळगत, निवासी उपजिल्हाधिकारी वडदकर यांनी सर्प मित्रांची टीम देखील बोलावली आहे. प्रशासनाच्या जलदगतीने केलेल्या या हालचालीमुळे भाविकांना वेळेतच मदत मिळाली आहे. महावितरण सार्वजनिक बांधकाम विभाग यासह इतर सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना निवासी उपजिल्हाधिकारी वडदकर यांनी तातडीने घटनास्थळी पाचारण केले.महापालिका उपायुक्त संधू, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मिर्झा बेग, कार्यकारी अभियंता बाबरे, शहर अभियंता सुमंत पाटील, कनिष्ठ अभियंता किरण सूर्यवंशी आदी अधिकारी घटनास्थळी मदतकार्यासाठी तत्पर होते.
माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकरही घटनास्थळी धावले…पंडित प्रदीप मिश्रा यांच्या महाशिवपुराण कथा मंडपात पावसाचे पाणी शिरल्याने भाविक अडचणीत सापडल्याची माहिती मिळताच माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हेही तातडीने मोदी मैदानावरील सभा मंडपात पोहोचले. त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना संपर्क साधून मदत कार्याला गती देण्याचे निर्देश दिले. स्वतः त्यांनीही आयोजकांशी, प्रशासकीय यंत्रणेशी चर्चा करून या भाविकांच्या राहण्याची काय व्यवस्था करता येईल, त्यांना कशी मदत करता येईल याबाबत सूचना दिल्या.