
नांदेड – लोकसभा निवडणुकीत आपण एका पक्षाचे कट्टर कार्यकर्ते आहोत, एका नेत्याचे कट्टर समर्थक आहोत हे दर्शवण्यासाठी मतदान केंद्रावर मतदान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या तीन कार्यकर्त्यांविरुद्ध नांदेडमध्ये आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे या कार्यकर्त्यांना आता आपण दर्शवलेली पक्ष आणि नेत्याप्रतीची भक्ती महाग पडल्याचेच स्पष्ट होत आहे.
लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदार संघासाठी २६ एप्रिल रोजी मतदान झाले. नांदेड मतदार संघासाठी एकूण २ हजार ६८ मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडली. यावेळी नांदेड शहरातील जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल मतदान केंद्र, तरोडा आणि अन्य एका मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन येऊ नये, असे छापील बॅनर लावलेले असतानासुद्धा मतदान करताना ईव्हीएम मशीन तसेच व्हीव्हीपॅटचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर प्रसारित केला. यातून आदर्श आचारसंहितेचा भंग करण्यात आला आहे, अशी तक्रार नांदेड शहरातील वजिराबाद ठाण्यात आणि विमानतळ ठाण्यात देण्यात आली. या तक्रारीवरून वजिराबाद ठाण्यात दोन गुन्हे तर विमानतळ ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मतदानाची प्रक्रिया पार पडत असताना अनेक महाभागांनी आपण केलेल्या मतदानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. यामध्ये आपण एका पक्षाचे, एका नेत्याचे कट्टर समर्थक आहोत हे दर्शवण्यासाठीच मतदान करताना पक्ष निशाणी दर्शविणारे व्हिडिओ तयार केले. ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही केले. मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन येऊ नये असे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. असे असतानाही मतदान केंद्रापर्यंत, अगदी ईव्हीएम मशीनपर्यंत मोबाईल नेताना, तेथे मतदान करताना केंद्रावरील पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना का अडवले नाही, मतदान केंद्राध्यक्षाच्या लक्षात हा प्रकार का आला नाही आणि मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी त्यांना का अडवले नाही हे प्रश्नही अनुत्तरीतच आहेत.