
नांदेड – अवैधरित्या उत्पादित होणाऱ्या गावठी दारू, त्याचप्रमाणे बनावट व परराज्यातून कर बुडवून येणाऱ्या देशी व विदेशी दारू विक्रीविरुद्ध पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभाग हे आता संयुक्तपणे कारवाई करणार आहेत. नांदेड पोलीस परिक्षेत्रात दोन महिन्यात पाचवेळा एकाच दिवशी केलेल्या कारवाईत एकूण १ हजार ३४ केसेस केल्या आहेत.तर तब्बल ५९ लाख ६९ हजार ५१९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांचे पार्श्वभूमीवर, नांदेड परिक्षेत्रातील, उत्पादन शुल्क विभागाच्या कामकाजाचा आढावा मंगळवारी राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नांदेड येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात घेतला. याप्रसंगी, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी मागील दोन महिन्यांत दारूबंदी संदर्भात पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. नांदेड परिक्षेत्रातील पोलिसांनी मागील दोन महिन्यात, गावठी दारूचे गाळप रोखण्याकामी एकूण पाच मासरेड आयोजित केल्या होत्या. यात, पोलिसांनी विविध ठिकाणी छापेमारी करून, गावठी दारू गाळणाऱ्या इसमांविरुद्ध एकूण १ हजार ३४ केसेस केल्या आहेत तर तब्बल ५९ लाख ६९ हजार ५१९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती दिली.
विधानसभा आणि नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी तेलंगणा व कर्नाटक राज्यांचे सीमेवर पोलीस व उत्पादन शुल्क विभागाचे चार संयुक्त तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. सदर तपासणी नाक्यांवरून परराज्यातील अवैधपणे व कर बुडवून येणारी दारू राज्यात येऊ नये, म्हणून प्रयत्न होणार आहे. याप्रसंगी, उत्पादन शुल्क विभागाचे सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त तडवी, अधीक्षक गणेश पाटील, केशव राऊत, आदित्य पवार व चारही जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांची उपस्थिती होती.
राज्यातील विधानसभा निवडणुकांचे पार्श्वभूमीवर, निवडणूक प्रक्रिया प्रलोभन विरहित होण्याकरिता, हातभट्टी गाळप करणारी ठिकाणे, बनावट दारू बनविणारे अड्डे यांचेसह विविध प्रकारची दारू राज्यात आणणारी रॅकेट्स उध्वस्त करण्यासाठी नांदेड परिक्षेत्रातील पोलीस व उत्पादन शुल्क विभाग संयुक्तपणे कारवाई करणार असल्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.